भुसावळातील आयोध्यानगरात भूमीगत बोगद्याची रहिवाशांची मागणी

भुसावळ प्रतिनिधी । रेल्वे ब्रिज ते नवोदय विद्यालय चौफुली दरम्यान कोणत्याही प्रकारची प्रवासी सुविधा नसल्याने अयोध्यानगर जवळ अंडरग्राऊंड बोगदा तयार करावा, अशी मागणी ‘नही’ विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत नहीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

रेल्वे ब्रिज ते नवोदय विद्यालय चौफुली परिसरात येण्यासाठी दीड किलोमीटरच्या वेढ्याने फिरून यावे लागणार आहे. आधीच पेट्रोलचे भाव गगनाला भिडले असून दररोज दीड किलोमीटरचा फेरा वाढेल यामुळे नागरिक त्रस्त होतील. तरी याभागात योग्य प्रकारे मेडियन किंवा बोगदा झाल्यास नागरिकांची गैरसोय दूर होईल व शहरात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीचे होणार आहे अशी मागणी याप्रसंगी नागरिकांच्या वतीने प्रा.धिरज पाटील यांनी केली.

बोगदा मिळाल्यास अनेकांची गैरसोय टळणार
शहरातील अयोध्या नगर, श्रीनगर, भोई नगर, जुना सातारा, मुक्ताई कॉलनी, खळवाडी, रेल दुनिया, गणेश कॉलनी, भिरुड कॉलनी, हुडको कॉलनी, स्वामी विहार, जळगांव रोड परिसरातील शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी व साधारण ३० हजार नागरिकांसाठी वरणगाव, जामनेरकडे जाण्यासाठी तसेच जळगावहुन भुसावळात येण्यासाठी कोणतीही ठोस सुविधा नसल्याने २० मार्च रोजी परिसरातील मंगला पाटील, शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, शंतनू पाथरवट, वर्षा वाडीले, विशाल ठोके, अर्चना चौधरी, सुरेश वैद्य, वैभव वैद्य, कुशल पाटील, किशोर पाटील, लव झाडगे, स्वप्नील चौधरी, साहित्य गोयल, भीमराव पाटील मुकेश कोळी, योगेश वैद्य, महाले सर, व नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे जळगाव विभागाचे प्रमुख चंद्रमोहन सिन्हा यांना अयोध्या नगर राष्ट्रीय महामार्ग सहा येथे निवेदन सादर केले.

आंदोलनाचा इशारा
जामनेर रोड परिसरातील महाविद्यालय व शाळांमध्ये या भागातील हजारो विद्यार्थी शिकतात, त्यांना गैरसोय होणार आहे. तसेच परिसरातील महिला, शेतकरी, जेष्ठ नागरिकांना ये-जा करणे कठीण होईल अशी समस्या मंगला पाटील व नागरिकांनी मांडली आहे. योग्य उपाययोजना केल्या जातील असे चंद्रमोहन सिन्हा यांनी सांगितले तर परिसरातील नागरीकांची मागणी पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा याप्रसंगी देण्यात आला.

Protected Content