भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ नगरपालिकेतील सत्ताधार्यांनी भ्रष्टाचाराशिवाय काहीही केले नसून गावात कोणतेही कामे केलेली नाहीत. यामुळे कामेच नाही म्हणून नागरिकांनी कर भरू नये असे आवाहन माजी आमदार संतोष चौधरी यांनी केले आहे. ते आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
माजी आमदार संतोष चौधरी यांनी शनि मंदिर वॉर्डातील त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगरपालिकेतील सत्ताधार्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, सत्ताधारी विकास कामे,स्वच्छता,रस्त्यांसह सर्व कामांमध्ये नापास झाले असून त्यात स्वच्छतेसाठी अतिरिक्त कर आकारत असून भुसावळकरांनी नगरपरिषदेचा कुठलाही कर भरून नये. आज नगरपरिषदेच्या सभेत १ ते १० विषयांचे ते ही पुर्ण वाचन न करता सभा गुंडाळण्यात आली. यामुळे ही सभा बेकायदेशीर असून त्यात नकली प्रोसेडींग होण्याची शक्यता असल्याने सीसीटीव्हीच्या आधारे मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल पाठवायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर, चार महिन्यानंतर झालेली सभा जणू नगरपरिषदेला विकण्यासाठी झाली असावी असा टोला त्यांनी मारला. दरम्यान, आजच्या सभेत काही वादग्रस्त जुनी बीलेही मंजुर करण्यात आली. आरक्षण क्र.१९४/२ ही वांजोळा रस्त्यावरील आरक्षित जागा असुन माझ्या संस्थेला देण्यात आली आहे. त्यापोटी ३० वर्षे कराराची रक्कम नगरपरिषदेला भरणा केलेली असतांना ती जागा परत देणे बेकायदेशीर आहे. त्यात आर्थिक गौडबंगाल आहे. लोकसंख्येनुसार आरक्षित भुखंड जास्त हवे असतांना कमी केले जात आहे. गटारीच्या कामांमध्येही मोठे घोटाळे असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कामे होत असून भोळे परिवाराच्या सातबारा उतार्यांवर बोजा बसवूनमोघम ठराव सुध्दा केले जात आहे.भुसावळ शहराला तीन तारांकीत शहराचा दर्जा मिळवून देण्याचा हास्यास्पद प्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, आज सकाळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत गटनेतेपदी दुर्गेश ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीदेखील संतोष चौधरी यांनी दिली. या पत्रकार परिषदेला सचिन चौधरी,दुर्गेश ठाकुर,उल्हास पगारे,आशिक खान, नितीन धांडे, सलीम पिंजारी, सिकंदर खान, अशोक चौधरी, आशिष बोरसे, जाकीर शेख,सचिन पाटील, तम्मा पहेलवान आदी उपस्थित होते.