चाळीसगाव प्रतिनिधी । भीमा कोरेगाव प्रकरणातील एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांना तात्काळ सुटका करून यात ज्यांनी षडयंत्र रचलेले त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जन आंदोलन खान्देश विभागाचे प्रमुख प्रा. गौतम निकम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत वृत्त असे की, भीमा कोरेगाव एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांची कोठडीतून सुटका करावी व याप्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जन आंदोलन खान्देशने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिका स्थित आर्सेनल या डिजिटल फॉरेन्सिक मधील तज्ज्ञ कंपनीने नुकतेच प्रकाशित केलेल्या अहवालात ऍड. गडलिंग यांच्या लॅपटॉप मध्ये मालवेअर द्वारे काही फाईल्स टाकण्यात आल्या आहेत. या फाईल्सच्या आधारे गडलिंग यांना अटक करण्यात आली आहे. जे पुरावे असे डिजिटल पद्धतीने षडयंत्र करून लॅपटॉपमध्ये टाकण्यात आले. त्यावर विश्वास ठेऊन त्यांना जेलमध्ये ठेवणे हे न्यायाला धरून कसे? असा प्रश्नही जन आंदोलन खान्देशने केला आहे.
या संदर्भात नमूद केले आहे की, याआधी या प्रकरणातील आरोपी रोना विल्सन यांच्या लॅपटॉप मध्ये देखील अशाच पद्धतीने खोटे पुरावे पहायला मिळाले असल्याचे आर्सेनल कंपनीने फेब्रुवारी महिन्यात जाहीर केले होते्. यासंदर्भात बातमी वॉशिंग्टन पोस्ट या नामांकित वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे एल्गार परिषद आणि संबंधित कार्यकर्त्यांना जाणून बुजून षडयंत्र करून त्यांच्या लॅपटॉप मध्ये पुरावे घुसवून. त्यांना अटक करण्यात आली असल्याचे आरोप जन आंदोलन खान्देशने केला आहे. तसेच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांना त्यांच्या विरोधातील पुराव्यांच्या शहानिशा करण्याची देखील संधी न दिल्याने हे अन्यायकारक असल्याचे जन आंदोलन खान्देशने सांगितले आहेत.
या प्रकारातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांचा कारागृहात दुर्दैवी मृत्यू झाले आहे. त्यामुळे आरोपींना शिक्षा ठोठावून निर्दोषांना तात्काळ मुक्तता करावी अशी मागणी जन आंदोलन खान्देश विभागाचे प्रमुख प्रा. गौतम निकम यांनी केले आहे. निवेदनावर शत्रुघ्न नेतकर, विजय शर्मा, योगेश्वर राठोड, आबा गुजर बोरसे, नाशीर भाई शेख, मिलिंद अशोक भालेराव, गणेश भोई, प्रदीप चौधरी, अशोक राठोड, भावराव गांगुर्डे, आर के माळी, सागर नागणे व संदिप पाटील आदींनी सह्या केल्या आहेत.