भुसावळ प्रतिनिधी । वर्ग आणि वयानुसार विद्यार्थ्यांच्या क्षमता लक्षात घेऊन त्यांची भाषिक कौशल्य विकसित होण्यासाठी पाठ्यपुस्तकाची रचना करण्यात आली आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून क्षमता किंबहुना भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेची संधी द्यावी, असे आवाहन बालभारतीच्या मराठी विशेषाधिकारी श्रीमती सविता वायळ यांनी केले.
जळगाव जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे आयोजित लेखक-कवींशी ऑनलाईन संवाद सत्राच्या समारोपाप्रसंगी श्रीमती वायळ बोलत होत्या. प्रारंभी बालभारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी ऑनलाईन संवाद सत्रात पार पडलेल्या एकूण बारा लेखक-कवींसह दोन संवाद सत्र अशा चौदा सत्रांचा थोडक्यात आढावा घेतला आणि श्रीमती वायळ यांचा परिचय करून दिला.
सविता वायळ म्हणाल्या की, सध्या कोरोनाचे जागतिक संकट आहे. तरीसुद्धा शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यात समन्वय साधून पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी यांच्यापर्यंत पोहोचण्याचा स्तुत्य उपक्रम डॉ. जगदीश पाटील यांनी राबवला. शाळा कधी सुरू होतील हे सांगता येत नसले तरी शिक्षकांनी आधीपासूनच ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे सुरू केले आहे. शाळा बंद असली तरी शिक्षण मात्र सुरू राहील यासाठी शिक्षक धडपडत आहेत. सध्या विद्यार्थी घरी असल्याने पालकांची जबाबदारी वाढली आहे. त्यांनीसुद्धा पाठ्यपुस्तके हाताळून मुलांशी चर्चा करावी आणि त्यांच्याशी संवाद साधावा. तसेच विद्यार्थ्यांनी संकट हीच संधी समजून संकटाकडे नकारात्मक भूमिकेने न पाहता सकारात्मकतेने पाहावे, असे आवाहनही श्रीमती वायळ यांनी केले. याचबरोबर त्यांनी पाठ्यपुस्तक निर्मितीमागची भूमिका, पाठ्यपुस्तक निर्मिती करतानाचा अनुभव आणि पाठ्यपुस्तक हातात आल्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया याविषयी माहिती दिली. त्यानंतर डॉ. माधुरी जोशी नागपूर, जळगाव डायटचे अधिव्याख्याता प्रा. शैलेश पाटील, सुनिता गोळे मुंबई, पी.एस. पाटील जामठी, दीपक चौधरी बोदवड, मनीषा भटकर यांनी मनोगत व्यक्त केले. सविता वायळ यांच्यासह एकूण पंधरा ऑनलाईन संवाद सत्र पार पडले. त्याचा लाभ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी घेतला.