भाषा शिक्षकाची भूमिका महत्त्वपूर्ण ; डॉ. नीलिमा गुंडी

भुसावळ, प्रतिनिधी । पाठ्यपुस्तक भाषा शिकण्याचे माध्यम आहे. पाठ व कवितांमधील विविध जागा शोधून भोवतालच्या जगाच्या भाषा व समाजाशी विद्यार्थ्यांना जोडता आले पाहिजे. त्यासाठी भाषा शिक्षकाकडे भाषा शिक्षक व साहित्याचा शिक्षक अशी दुहेरी जबाबदारी असते. साहित्याचा पाया भाषा असल्याने आपली भाषा समृद्ध झाल्याशिवाय आपल्याला साहित्यातील बारकावे कळणार नाही. त्यामुळे भाषा शिक्षकाची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन भाषातज्ज्ञ तथा दहावी पाठ्यपुस्तकातील “बोलतो मराठी…” या पाठाच्या लेखिका डॉ. नीलिमा गुंडी यांनी केले.

जळगाव जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे सुरू असलेल्या झूम ॲपद्वारे ऑनलाईन पाचव्या सत्रात डॉ. नीलिमा गुंडी यांनी संवाद साधला. प्रास्ताविक मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील केले. दीपक चौधरी यांनी परिचय करून दिला. त्यानंतर डॉ. गुंडी म्हणाल्या की, भाषा शिक्षकाकडे शैक्षणिक पदवीसह संवेदनशीलता व शोधक वृत्ती असावी. तो जाणकार, वाचक, चिकित्सक, अभ्यासक, सर्जनशील व परिवर्तनशील माणूस असावा. एवढेच नाही तर तो मराठी भाषेचा कार्यकर्ता असावा. प्रत्येक भाषेत परकीय भाषेतील शब्द असतात. परंतु आपल्या भाषेत ताकदीचे शब्द असताना आपण त्यातील शब्दसंपत्तीकडे पाठ फिरवून अंधानुकरण करतो, याची खंत वाटते. भाषा शिकतांना व्याकरण व नियमाने शिकली पाहिजे असे नाही. तिला भोवतालच्या जगाशी जोडून, भाषेतील गंमत सांगून शिकता येईल. मराठीत उच्चार कोश नसल्याने अडचणी येतात. परंतु, हीच भाषेची गंमत म्हणून विद्यार्थ्यांना सांगता येईल. त्याकरिता शिकवण्याच्या विविध पद्धती शिक्षकांनी वापराव्यात, असे आवाहनही डॉ. गुंडी यांनी केले. हर हर महादेव या घोषणेत हर म्हणजे हरणे नव्हे तर महादेवाला केलेले त्रिवार वंदन आहे. भाषेचे सौंदर्य व गंमत विद्यार्थ्यांना चाखता यावी यादृष्टीने भाषा शिकली पाहिजे, असे मार्गदर्शनही त्यांनी केले. ऑनलाईन संवाद सत्राचे आभार दीपक चौधरी यांनी मानले. सत्रात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी डॉ. जगदीश पाटील भुसावळ, वंदना भिरूड भुसावळ, दिलीप वैद्य रावेर, निर्मल चतुर यावल, संजय ठाकूर मुक्ताईनगर, व्ही.एन. पाटील जामनेर, दीपक चौधरी बोदवड, किशोर चौधरी मुक्ताईनगर यांनी परिश्रम घेतले.

Protected Content