जळगाव, प्रतिनिधी । भारत विकास परिषदेच्या जळगाव शाखेकडून कोरोना लॉकडाऊनच्या काळात लोकमत ह्या स्पर्धेचे माध्यम प्रायोजकाद्वारे ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत पुणे येथील उज्वला कानिटकर यांच्या ‘कोरोना नंतरचे जग’ या निबंधास प्रथम क्रमांक मिळाला आहे.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात या स्पर्धेत स्पर्धकांना “कोरोना नंतरचे जग”, “मज मी उमगलो”, “समाजशिस्त आणि मी” ह्या तीन विषयांवर निबंध लिहून दि. २७ एप्रिल २०२० पर्यंत आयोजकांकडे पाठवायचे होते. वरील विषयांवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच महाराष्ट्र बाहेरून सुद्धा लेखकांचा प्रतिसाद मिळाला. शेवटच्या तारखेपर्यंत एकूण १९२ निबंध प्राप्त झाले. स्पर्धेत वयाची अट नसल्याने वयवर्षे ८ पासून तर वयवर्षे ८६ पर्यंत स्पर्धक सहभागी झाले. त्यात ९० पुरुष तर १०२ महिला होत्या. “कोरोना नंतरचे जग” ह्या विषयावर सर्वाधिक १०२ निबंध आले. त्याखालोखाल “मज मी उमगलो” ह्या विषयावर ५२ निबंध, तर “समाजशिस्त आणि मी” ह्या विषयावर ३८ निबंध स्पर्धेसाठी आले. स्पर्धेत जळगाव, धुळे, सोबतच मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, औरंगाबाद, अकोला, बुलढाणा, नागपूर आदी जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील अहमदाबाद, इंदौर, हैदराबाद अश्या ठिकाणाहून सुद्धा स्पर्धकांचे निबंध प्राप्त झाले होते. ह्या निबंधांचे मूल्यांकन जळगाव उ.म.वि. प्रा. डॉ. जयदीप साळी, प्रवीण पाटील, मनोज पाटील, ब. गो. शानभाग विद्यालय, जळगाव अनुराधा देशमुख , प्रवीण डी. पाटील, रामचंद्र पी. पाटील, आर. आर. विद्यालय, जळगाव वीणा बाविस्कर ह्यांनी केले. परीक्षकांनी प्रत्येक गटातून ३ अश्या २० उत्तम निबंधांची निवड केली. ह्या २० निबंधांचे महाअंतिम परिक्षण गिरीश कुलकर्णी ह्यांनी करून त्यातून अंतिम ५ स्पर्धकांची निवड केली, ती खालीलप्रमाणे:
प्रथम क्र :उज्वला कानिटकर, पुणे (कोरोना नंतरचे जग), द्वितीय क्र.:स्नेहल जोशी, जळगाव (मज मी उमगलो), तृतीय क्र.: सायली चोपडे, चोपडा, जळगाव (कोरोना नंतरचे जग), चतुर्थ क्र.: राहुल देसाई, आरोळी ता. आजरा, कोल्हापूर (कोरोना नंतरचे जग), पंचम क्र.: चैत्रा पानट , जळगाव (मज मी उमगलो). स्पर्धेच्या यशस्वीतते करिता प्रांत अध्यक्ष तुषार तोतला ह्यांच्या सोबतच शाखाध्यक्ष प्रसन्न मांडे, शाखा सचिव विशाल चोरडिया ,प्रकल्प प्रमुख रत्नाकर गोरे , सहप्रकल्प प्रमुख प्रतिमा यादनिक ह्यांनी प्रयत्न केले.