वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । अमेरिकेत सत्ता परिवर्तन झाल्यानंतर राष्ट्रपती जो बायडन यांच्या सरकारने भारताला इंडो-पॅसिफिक भागातील महत्त्वाचा मित्र असल्याचे म्हटले आहे.
जगातील एक प्रमुख शक्ती म्हणून भारताचा उदय आणि या भागातील महत्त्वाच्या भूमिकेचे अमेरिका स्वागत करत असल्याचे बायडन प्रशासनाने म्हटले. अमेरिकेने चीनच्या सातत्याने धमकी देण्याच्या भूमिकेवर चिंता व्यक्त केली.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेडा प्राइस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, इंडो-पॅसिफिक भागात भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार आहे. आम्ही भारताला जगातील एक प्रमुख शक्ती म्हणून असलेल्या भूमिकेचे स्वागत करतो. याआधी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथोनी ब्लिंकन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत मंगळवारी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी म्यानमारमधील परिस्थितीसह अन्य मुद्यांवर चर्चा केली होती.
ब्लिंकन यांनी म्यानमारमध्ये झालेल्या लष्कराच्या उठावावर चिंता व्यक्त केली. दोन्ही नेत्यांमध्ये इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारत आणि अमेरिकेतील सहकार्यासह अन्य मुद्यांवर चर्चा केली. प्राइस यांनी सांगितले की, अमेरिका-भारत यांच्यात क्वाडच्या माध्यमातून क्षेत्रीय सहकार्य करणे आणि कोरोना महासाथ आणि हवामान बदलसारख्या आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाण्याची तयारी दर्शवली.
नेड प्राइस यांनी सांगितले की, भारत-चीन सीमावादावर अमेरिकेचे लक्ष आहे. आपल्या शेजारच्या देशांना सातत्याने चीनकडून धमकी दिली जात असून ही बाब अतिशय चिंतेची असून अमेरिकेचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि चीन दरम्यान चर्चा सुरू असून सीमावादावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढता येऊ शकतो. सीमावादाचे निराकरण शांततेच्या मार्गाने झाले पाहिजे अशी अमेरिकेची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
बायडेन यांनी अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून पदग्रहणाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच सोमवारी दोन्ही नेत्यांचे दूरध्वनीवरून संभाषण झाले. इंडो-पॅसिफिक सहकार्य वाढवून मुक्त प्रवास, प्रादेशिक अखंडता आणि प्रादेशिक साहचर्य वाढवण्यावर क्वाड देशसमुहाच्या माध्यमातून भर दिला जाईल, असे बायडेन यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘कोविड-१९’विरोधातील लढाई जिंकण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्रित प्रयत्न करतील, हवामान बदलासंदर्भातील मुद्द्यांवर नव्याने चर्चा केली जाईल आणि जागितक अर्थव्यवस्थेची फेरउभारणी करून उभय देशांतील नागरिकांना त्याचा फायदा होईल, असे वातावरण तयार करता येईल, यावर उभय नेत्यांचे एकमत झाले. जागतिक दहशतवादाविरोधात एकत्र पावले उचण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
बायडेन यांनी या चर्चेत जगभरातील लोकशाही संस्था आणि निकषांचे रक्षण करण्याची आपली इच्छा अधोरेखित केली आणि लोकशाही मूल्यांबद्दलची सामायिक बांधिलकी अमेरिका-भारत संबंधांना आधार देणारी असल्याचे नमूद केले. म्यानमारमध्ये कायदा व सुव्यवस्था तसेच लोकशाही प्रक्रियेचे पुनरुज्जीवन करण्यावर उभय नेत्यांनी भर दिला.