नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारत पाकिस्तानला ४.५ कोटी लसींचा पुरवठा करणार आहे. जागतिक सामंजस्य अंतर्गत भारताकडून हा लसींचा पुरवठा होणार असल्याचं राष्ट्रीय आरोग्य सेवा, नियमन आणि समन्वय फेडरल सेक्रेटरी आमीर अशरफ ख्वाजा यांनी सार्वजनिक लेखा समितीला सांगितलं आहे.
एक करारानुसार लसींच्या पुरवठ्यासाठी हातमिळवणी करण्यात आली आहे. यामुळे जगातील अर्ध्याहून अधिक मुलांचं प्राणघातक आणि संसर्गजन्य रोगांविरोधात लसीकरण केलं जातं. कोरोना संकटाच्या काळातही पाकिस्तानला ही मदत केली जात होती. सप्टेंबर २०२० मध्ये पाकिस्तानला कोरोना लस पुरवण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
ख्वाजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, GAVI करारांतर्गत ४.५ कोटी लसीचे डोस मिळणार असून यामधील १.६ कोटी डोस हे जून महिन्यापर्यंत उपलब्ध होतील. समितीला माहिती देत असताना सिनेटर मुशहिद हुसैन सय्यद यांना लसीचे डोस कुठून येत आहेत यासंबंधी विचारणा करण्यात आली. यावेळी आरोग्य सचिवांनी पाकिस्तानला सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होणारे लसीचे डोस मिळणार असल्याची माहिती दिली.
“GAVI करारांतर्गत भारतात निर्मिती करण्यात आलेली लस पाकिस्तानी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. विकसनशील आणि गरीब देशांना लस पुरवणं हा या कराराचा मुख्य हेतू आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.