नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतीय टेक्नॉलॉजी प्रोफेशनल्स जे सध्याच्या कोरोनाच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. त्यांना ‘रिमोट वर्क’साठी जगभरातील इतर कंपन्यांकडून कामाच्या अनेक ऑफर येत आहेत. कोविडच्या उद्रेकानंतर आता जगभरात कामाची ही नवी पद्धत रुजू पाहत आहे.
जगभरातील अनेक कंपन्या भारतातील हायप्रोफाईल टेक्निकल टॅलेंटच्या शोधात आहेत. कोरोनाचा काळ सुरु होण्यापूर्वी या प्रोफेशनल्सना जेवढी मागणी होती त्यापेक्षा दोन ते तीन टक्के जास्त मागणी सध्या या लोकांना मिळत आहे. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिलं आहे.
या हायप्रोफाईल टेकीजना अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि मध्य आशियातील Instahyre, Interviewbit, Rocket, Techfynder, CIEL HR Services and Pesto Tech यांसारख्या कंपन्या कामावर रुजू करुन घेण्यास उत्सुक आहेत.
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत कंपन्या नवी भरती करण्यास उत्सुक नव्हत्या. त्यांचा व्यवसाय थंड पडला होता. मात्र, त्यानंतर जुलै ते सप्टेंबर या काळात भरती प्रक्रियेत वाढ झाली आहे. इन्स्टाहायर सध्या ८,७०० कंपन्यांसोबत काम करत आहे. गेल्या वर्षी हा आकडा ५,३०० इतका होता. त्याचबरोबर कंपनीचा महसूलही तीन ते चार टक्क्यांनी वाढला आहे. यामध्ये बहुतकरुन त्यांचे क्लायन्ट्स हे अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील आहेत.
अमेरिकेत नोकरीनिमित्त जाण्यासाठी H-1B व्हिसा आवश्यक आहे पण त्याला वेळ लागत असल्याने घरुनच काम करताना रिमोट पद्धतीने काम करण्यावर परदेशातील कंपन्या भर देत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील जे टॅलेंटेड प्रोफेशनल्स आहेत त्यांना हे रिमोट वर्कच्या कामाचा सध्या ट्रेन्ड आला आहे.
युके आणि आयरलंड येथून फेब्रुवारीपासून निवडक टेकीजसाठी २० टक्के मागणी वाढली आहे. सहा महिन्यांत टेकफाईंडरने शंभर भारतीयांना परदेशी कंपन्यांची काम मिळवून दिली आहेत. यामध्ये पेस्टो टेक भारतीय इंजिनियर्सना रिमोट वर्कसाठी संधी देत आहे.