कोविड योध्द्यांना ११ महिन्यांसाठी नियुक्ती मिळावी – डॉ. नि. तु. पाटील

भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्यात आलेले आरोग्य सेवक आणि अन्य कोरोना योध्द्यांना ११ महिन्यांची नियुक्ती मिळावी अशी मागणी भाजप वैद्यकीय आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी केली आहे.

डॉ. नि.तु. पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहले आहे. यात म्हटले आहे की, कोरोना ही साथरोग आटोक्यात आणण्याच्यादृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्यातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने तसेच साधनसामुग्री व विविध पदांवर कर्तव्य बजावणारे मनुष्यबळ कमी असल्याने आरोग्य अभियान आणि जिल्हा एकात्मिक आरोग्य विभाग विभागाच्या यंत्रणेमार्फत ऑनलाईन जाहिराती प्रमाणे जी.एन.एम.,ए.एन.एम,डाटा एंट्री ऑपरेटर,फार्मसिस्ट,डॉक्टर,सफाई कामगार,विविध टेक्निशियन,भांडारपाल,वार्डबॉय आधी पदांची रोजंदारी पद्धतीने हजारोच्या संख्येने नोकर भरती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचार्‍यांना सुद्धा करोना योद्ध्या म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ज्या काळामध्ये करोंना रुग्णांना हात लावण्यासाठी सुद्धा नागरिक घाबरत होते,जवळ जाण्यास भीती वाटत होती. करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत होता,मृत्युदरसुद्धा वाढत होता असे असून सुद्धा नियुक्त केलेले सर्व आरोग्य सेवक हे आपले कार्य इमाने-इतबारे करत होते. आता यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने त्यांच्या जगण्याचा प्रश्‍ननिर्माण झाला आहे.ज्यावेळेस शासनाला करोनाचाअटकाव करण्याची गरज होती त्यावेळेस सर्व महाराष्ट्रातील आरोग्य सेवकांनी स्वतः च्या जीवाची आणि परिवाराची कुठलीही पर्वा न करता संपूर्ण आपले लक्ष करोनाकार्यात वाहून घेतले. आणि आताकुठे संख्या कमी होत आहे असे वाटते. तर त्यांच्या नोकरीवर गदाआणण्याचे काम हे शासन करत आहे हा शासनाचा दुटप्पीपणा असल्याचा आरोप यात केला आहे.

यात पुढे म्हटले आहे की, आता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता दिसून येत असल्याने राज्यभरात कोविड-१९च्या काळामध्ये जे जे आरोग्य सेवक,करोना योद्धा हे तात्पुरत्या पद्धतीने भरले गेले असतील,त्या सर्वांना पुढील अकरा महिन्यांसाठी सलग पुनर्नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी यात करण्यात आली आहे.

या संदर्भात भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि.तु. पाटील म्हणाले की, आजवर आलेल्या साथ आजारांचा विचार करता दुसरी लाट नेहमी सुप्त असते. पण करोना मात्र त्याला अपवाद ठरत आहे,त्यामुळे ती जास्त धोकेदायक आहे. आगामी काळात रुग्णांची संख्या वाढली असता अपुरे मनुष्यबळ ठेवून आपल्याला साथीचा अटकाव करता येणार नाही. म्हणून महाराष्ट्र शासनाने तीन, तीन महिन्यांचे पुनर्नियुक्ती आदेश न देता सलग अकरा महिन्याचे पुनः नियुक्तीचे आदेश आरोग्य सेवकांना देण्यात यावे, अशी आमची आग्रहाची मागणी आहे.

Protected Content