नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यात विविध संरक्षण करारांवर शिक्कामोर्तब होणार आहे. पण व्यापारी करारावर एकमत व्हावे, यासाठी मागच्या काही दिवसांपासून दोन्ही देशांच्या अधिकारीवर्गामध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. भारताची काही मुद्दावर तयारी होती, पण अमेरिकेनेच शेवटच्या क्षणाला या करारातून माघार घेतल्यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे.
ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात छोटयात छोटा व्यापारी करार व्हावा, यासाठी दोन्ही देशांचे अधिकारी चर्चा करत होते. परंतू अमेरिकेला मोठा आणि त्यांच्या हिताचा करार हवा असल्याने त्यांनी अखेरच्या क्षणी व्यापारी करारावर करण्यास नकार दिला. यानिमित्ताने दोन्ही देशांमध्ये व्यापारावरुन मतभेद कायम असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्या दौऱ्यात कुठल्याही व्यापारी करारावर स्वाक्षऱ्या होणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, भारतात येण्यापूर्वी ट्रम्प यांनी व्यापाराच्या मुद्दावरुन आपली नाराजीही प्रगट केली आहे. भारताने अमेरिकेला चांगली वागणूक दिली नाही असेही ट्रम्प म्हणाले होते.