नवी दिल्ली: वृत्तसंस्था । संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार २०२५ पर्यंत भारतातील एक हजाराहून अधिक धरणे असतील जी ५० वर्षांपेक्षा जास्त जूनी असतील. या धरणांमुळे धरणाच्या खालील बाजूस राहणाऱ्या लोकांसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
२०५० पर्यंत जगातील बहुतांश लोकांचा रहिवास धरणांच्या जवळपास असेल. त्यामुळे ५० वर्षे आणि त्याहून अधिक वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या धरण धोकादायक ठरु शकतात, असा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे.
जगभरात ५८७०० मोठी धरणं आहेत जी १९३० ते १९७० दरम्यान बांधली गेलीत. या धरणांच्या बांधकामाला सरासरी ५० ते १०० वर्षे होत आली आहेत. धरणाचं बांधकाम केल्यानंतर ५० वर्ष पूर्ण झाल्यानंतर धरणाच्या भिंतीच्या मजबुतीबद्दल अडचणी निर्माण होतात. त्या दुरुस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्चे करावे लागतात. धरणात हळूहळू गाळ जास्त जमा होऊ लागतो.
संयुक्त राष्ट्रांचा अहवाल अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, जपान, भारत, झांबिया आणि झिम्बाब्वेमधील जुन्या धरणांवर आधारित आहे. विसाव्या शतकात धरण बांधल्यामुळे जगात मोठी क्रांती झाली होती. पण, आता ही धरणे जुनी झाली आहेत. जगातील एकूण ५५ टक्के म्हणजेच ३२७१६ धरणे आशिया खंडातील चीन, भारत, जपान आणि दक्षिण कोरिया या चार देशांमध्ये आहेत. या चारही देशातील बहुतेक धरणे ५० वर्षे जुनी झाली आहेत. नेमकी ही परिस्थिती आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि पूर्व युरोपमधील धरणांची देखील आहे.
२०२५ पर्यंत भारतामध्ये १११५ मोठी धरणं असतील जी ५० वर्षे जुनी असतील. २०५० मध्ये ही संख्या वाढून ४२५० पोहोचेल. भारतात २०५० पर्यंत ६४ मोठी धरणे अशी असतील जी १५० वर्षे जुनी होतील. केरळमध्ये मुल्लापेरियार धरण असे एक धरण आहे. हे धरण १०० वर्षांपूर्वी बांधले गेले. हे धरण फुटल्यास केरळ आणि तामिळनाडूला याचा फटका बसू शकतो. दोन्ही राज्यांमध्ये यावरुन वाद सुरु आहे.
अमेरिका आणि युरोपमधील धरणांबाबतही असाच धोका व्यक्त करण्यात आला आहे. जुन्या धरणांची दुरुस्ती किंवा सुधारणा करण्याचे काही आर्थिक व व्यावहारिक प्रश्न आहेत, ज्यामुळे ते थांबविण्यात आले आहेत. अमेरिकेत ९०५८० धरणं ५६ वर्ष जूनी आहेत. २०२० मध्ये केलेल्या अभ्यासात ८५ टक्के धरणांच्या पाणी साठवण क्षमेतवर परिणाम झाल्याचं दिसून आलं. अमेरिकेतील धरणे दुरुस्त करण्यासाठी अंदाजे खर्च ४६ अब्ज डॉलर्स आहे. अमेरिकेच्या
२१राज्यांत गेल्या ३० वर्षात १२७५ धरणे बंद झाली आहेत तर २०१७ मध्ये ८० धरणांमध्ये पाणी साठवणं बंद करण्यात आले आहे.
भारतासारख्या मोसमी पावसाच्या प्रदेशात पावसाळ्यात महापूर येतात. पावसाळ्यात धरणांत मोठ्या प्रमाणात पाणी साठा असतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळते.