नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतातील कोरोना तिसऱ्या टप्प्यात जाण्याचा धोका वाढल्याचे संकेत इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने दिले आहेत. विविध जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांचे नमुने आणि त्यांची पार्श्वभूमीची माहिती गोळा करत यातील आकडेवारीचा अभ्यास करून आयसीएमआरने हा धोक्याचा इशारा दिला आहे.
आयसीएमआरने मागील काही आठवड्यांपासून विविध जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांचे नमुने आणि त्यांची पार्श्वभूमीची माहिती गोळा केली. त्यानुसार देशात सामुहिक संसर्गाचा धोका वेगाने वाढत असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. आयसीएमआरनं १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल दरम्यान देशात आढळून आलेल्या ५ हजार ९११ कोरोना संक्रमितांचा अभ्यास केला. यातील १०४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. हे रुग्ण २० राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ५२ जिल्ह्यांमधले होते. १०४ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४० जणांनी कधीही परदेश प्रवास केलेला नव्हता. याशिवाय ते परदेशातून आलेल्या कोणाच्याही संपर्कात आले नव्हते. त्यामुळे कोरोनाचे संकट तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच आयसीएमआरने देशात सामुहिक संसर्गाचा धोका जवळपास नसल्याचे म्हटले होते.