भारताकडून सहा शेजारी देशांना कोरोना लस पुरवठा

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आजपासून भारताकडून सहायता अनुदानांतर्गत सहा देशांना कोव्हिड १९ लस पुरवण्यात येणार आहे. या देशांमध्ये भूतान, मालदीव, बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार आणि सशेल्स या देशांचा समावेश आहे.

‘आंतरराष्ट्रीय समुदायाच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू सहकारी बनणं, भारतासाठी गौरवास्पद आहे. येणाऱ्या काही दिवसांत आणखीही घडामोडी घडतील’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर म्हटलं गेलंय.

 

देशांतर्गत गरज लक्षात घेतानाच भारत येणाऱ्या काही आठवड्यांत, महिन्यांत टप्प्याटप्प्यानं सहकारी देशांना कोव्हिड १९ लसीचा पुरवठा करेल, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मॉरीशिअस या देशांसोबत लसींच्या पुरवठ्यासंदर्भात आवश्यक नियामक मंजुरीची भारत प्रतिक्षा करत आहे. लसींच्या पुरवठ्यासाठी अनेक सहकारी आणि शेजारी देशांकडून भारतनिर्मित लसींची विचारणा भारताला करण्यात आलीय. कोव्हिड महामारीविरुद्ध मानवतेच्या या युद्धात सर्वांना मदत आणि भारतनिर्मित लसीच्या उत्पादनाच्या तसंच पुरवठ्याची वचनबद्धता ध्यानात घेता २० जानेवारीपासून भूतान, मालदीव, बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स या देशांना लस पुरवठा सुरू केला जाईल’, असंही मंत्रालयाकडूनं म्हटलं गेलंय.

भारतात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आलीय. पहिल्या टप्प्यात आत्तापर्यंत जवळपास ६.३१ लाखहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलंय.

Protected Content