जळगाव प्रतिनिधी । शेतीच्या पिकाचे नुकसान पाहून तालुक्यातील भादली येथील शेतकऱ्यांने घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रभाकर पांडूरंग कोळी (वय-५७) रा. भादली ता.जि.जळगाव यांचे भादली शेत शिवारात शेत आहे. पत्नी भारती, मोठा मुलगा निखिल व सुन असे सर्व शेती करून आपला उदरनिर्वाह करतात तर लहान मुलागा अमोल हा कापड दुकानावर कामाला आहे. यंदा त्यांनी शेतात उडीद व कापसाची लागवड केली होती. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले. तश्याच त्यांनी उडीदाची कापणी केली मात्र ती देखील पावसामुळे पुर्णपणे पिकाचे नुकसान झाले. नुकसान झाल्याचे काही दिवसांपासून प्रभाकर कोळी चिंतेत होते. आज सकाळी पत्नी, मोठा मुलगा आणि सुन शेतात गेले तर लहान मुलगा अमोल हा दुकानावर कामाला गेला. घरी कोणीही नसतांना दुपारी राहत्या घरात दोरीने गळफास घेवून प्रभाकर कोळी यांनी जीवन संपवले. सायंकाळी पत्नी व मुलगा घरी आल्यावर घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्यांना तातडीने खाली उरवून जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.