लखनौ : वृत्तसंस्था । बहुजन समाज पक्ष आणि भाजप या दोन पक्षांची विचारसरणी परस्परविरोधी असल्याचे नमूद करताना, विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांत भाजपसोबत युती करण्याची शक्यता बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी फेटाळून लावली.
उत्तर प्रदेश विधान परिषद आणि राज्यसभेसह आगामी निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी बसप भाजपच्या किंवा इतर कुठल्याही पक्षाच्या उमेदवारांना मतदान करेल, असे वक्तव्य मायावती यांनी केले होते. यामुळे अटकळी सुरू झाल्यानंतर त्यांनी हे घूमजाव केले आहे.
‘यापुढील कोणत्याही निवडणुकीत भाजप व बसप यांची युती होणे शक्य नाही. बसप जातीय पक्षासोबत निवडणूक लढू शकत नाही’, असे मायावती यांनी सांगितले. ‘आमची विचारसरणी सर्वजन सर्वधर्म हिताय’ अशी असून, ती भाजपच्या विचारसणीच्या विरुद्ध आहे. धार्मिक, जातीय आणि भांडवलशाही विचारसरणी असलेल्यांशी बसप युती करू शकत नाही, अशा पक्षांशी युती करण्यापेक्षा आपण राजकारणातून संन्यास घेऊ, असे मायावती यांनी सांगितले. मुस्लीम समुदायाने बसपपासून अंतर राखावे यासाठी सप व काँग्रेस हे आपल्या वक्तव्याचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप त्यांनी केला.