नवी दिल्ली: वृत्तसंस्था । बिहार विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर आता काँग्रेस तयारीला लागली आहे. बिहारमध्ये भाजपला सायलेंट वोटर्सचा मोठा फायदा झाला आणि भाजपच्या याच सायलेंट वोटर्सना म्हणजे महिला मतदारांना आकर्षीत करण्यासाठी काँग्रेसनं रणनिती आखली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचा सायलेंट वोटर्स म्हणजे महिलावर्गानं भाजपला मोठी साथ दिल्याचं दिसून आलं. त्यामुळे महिलावर्गाचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशिल आहे. त्यासाठी काँग्रेस नेते कामाला लागले आहेत. काँग्रेसनं सध्या ५ राज्यांसाठी खास रणनिती तयार केली आहे. त्यात तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पॉंडेचरी या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये यंदा विधानसभा निवडणूक होणार आहे.
यावर्षी ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे, त्या राज्यांमध्ये प्रत्येक बूथवर ५ महिला कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. महिला मतदारांचा विश्वास आणि पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळसह पाँडिचेरी या केंद्र शासित प्रदेशात मे महिन्यापूर्वी निवडणूक होणार आहे.
बिहारमध्ये भाजपनं दमदार विजय मिळवल्यानंतर आपल्या विजयाचं गमक सांगितलं आहे. मोदी सरकारनं महिला वर्गासाठी गॅस, शौचालय, गर्भवती महिलांसाठी आणि लहान मुलींसाठी सुरु केलेल्या योजना, अशा अनेक योजनांचं फळ बिहार निवडणुकीत मिळाल्याचं भाजप नेते सांगतात. ज्या मतदारसंघात महिला मतदारांची संख्या जास्त होती, त्या मतदारसंघात NDAच्या उमेदवाराचा विजय झाल्याचं काँग्रेसच्या लक्षात आलं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं महिला मतदारांवर लक्ष केंद्रीत केलं आहे.
पश्चिम बंगाल, तामिळनाडू अशा राज्यांमध्ये काँग्रेस मुख्य पक्ष नाही. आसाममध्ये हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचं राजकारण महत्वाचं ठरतं. त्यामुळे तिथे काँग्रेसला किती फायदा होईल, याबाबत शंका आहे. पण केरळमध्ये काँग्रेसला नव्या रणनितीनुसार फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.