भाजपला सत्ता म्हणजे दंगलींना आमंत्रण — ममता बॅनर्जी

 

कोलकाता : वृत्तसंस्था । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला  सत्ता देणं म्हणजे दंगलींना आमंत्रण देणं आहे.  पण ममता बॅनर्जींना कुणी हरवू शकत नाही. असे सांगत मी जिवंत आहे, तोपर्यंत भाजपला बंगालमध्ये संधी देणार नाही’, असं थेट आव्हान  दिलं आहे.

 

कोलकातामधील एका रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपवर जोरदार टीका केली

 

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देत आहे. पण तृणमूल काँग्रेसचं सरकार प्रत्येक शेतकऱ्याला ५ हजार रुपये देत आहे. मोफत पीक विम्याचीही व्यवस्था केल्याचं ममता यांनी सांगितलं.

 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. तृणमूल काँग्रेसचे अनेक बडे नेते, ममता बॅनर्जी यांचे खंदे समर्थक राहिलेले अनेक दिग्गज भाजपात दाखल झाले आहेत. अशावेळी पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी ममता बॅनर्जी कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे

 

 

भाजप तृणमूल काँग्रेसमधील भ्रष्टाचारी नेत्यांना विकत घेऊ शकते. मात्र, तृणमूल काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते विकले जाणार नाहीत, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला होता. तृणमूल काँग्रेसमध्ये भ्रष्टाचारी नेत्यांना स्थान नाही. त्यामुळे ज्यांना आमच्या पक्षातून बाहेर पडायचे आहे त्यांनी तातडीने निघावे, असा इशाराही त्यांनी भाजपात प्रवेश करु इच्छिणाऱ्यांना दिला होता.

 

काही दिवसात ११ नेत्यांनी टीएमसीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे टीएमसीचे धाबे दणाणले आहेत. पुढील काळातही टीएमसीमधून अनेक नेते भाजपमध्ये सहभागी होतील, असं सांगितलं जात आहे.

 

 

टीएमसीच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष हिरेन चॅटर्जी हे सुद्धा भाजपमध्ये सामिल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  टीएमसीने केवळ आपला वापर केलाय, असा आरोप त्यांनी केला होता.

Protected Content