धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेकडून हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान रेणू शर्मा या महिलेविरोधात आता भाजपा नेते कृष्णा हेगडे यांनी आंबोली पोलीस ठाण्यात हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याच्या प्रयत्नांचा तक्रार अर्ज दिला आहे.

“२०१० सालापासून रेणू शर्मा मला त्रास देत होती. वेगवेगळया फोन नंबरवरुन ती माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. मी तिला प्रत्येकवेळी टाळत होतो. रेणू शर्मा माझ्या मागे लागली होती. तिला माझ्यासोबत संबंध प्रस्थापित करायते होते. ती मला हनी ट्रॅपच्या जाळयात अडकवण्याचा प्रयत्न करत होती” असा आरोप कृष्णा हेगडे यांनी केला आहे.

“रेणू शर्मा माझ्या मागे लागली होती. तेव्हा, मी माझ्या काही परिचयाच्या माणसांकडून तिची माहिती काढली. तेव्हा, रेणू शर्मा फसवणूक करते, हनी ट्रॅपच्या जाळयात अडकवत असल्याची मला माहिती मिळाली” असे कृष्णा हेगडे यांनी सांगितले.

“तिने चार ते पाच वर्ष माझा पाठलाग केला. तिला तिच्या म्युझिक व्हिडिओसाठी पैसे हवे होते. म्हणून ती मागे लागली होती. सहा जानेवारीला २०२१ ला तिचा अखेरचा मेसेज आला. ‘तुम्ही मला विसरलात का?’ असे तिने म्हटले होते.” असे कृष्णा हेगडे म्हणाले.

 

“काही दिवसातच धनंजय मुंडे यांचे प्रकरण समोर आले. धनंजय मुंडे यांनी त्यांना ती महिला ब्लॅकमेल करत असल्याचे सांगितले. रेणू शर्मा सारखे जे लोक ब्लॅकमेल करतात, त्यांचा भांडाफोड झाला पाहिजे, सत्य समोर आले पाहिजे म्हणून मी आज तक्रार नोंदवण्यासाठी पुढे आलो” असे कृष्णा हेगडे यांनी सांगितले.

Protected Content