भाजपच्या शेतकरी मदत केंद्राचा प्रारंभ (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी।  माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी,  आगामी काळातले पक्षाचे कार्यक्रम हे बूथ स्तरापर्यंत राबवत आगामी जिल्हापरिषद ही  भाजपा स्वबळावर जिंकेल असा निर्धार व्यक्त केला. ते वसंत स्मृती कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे , प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ, अनुसूचित जमाती संपर्क प्रमुख अॅड.किशोर काळकर, किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र संयोजक सुरेश धनके, किसान मोर्चा नारायण चौधरी उपस्थित होते. 

 

बैठकीत  स्व. हरिभाऊ जावळे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त ‘बळीराजा मार्गदर्शन व सहाय्यता केंद्राची’ स्थापना करण्यात आली. आ.राजुमामा भोळे यांनी सांगितले की  योजनेतून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी आपल्या गावात एका फोनवर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता उपलब्ध होणार आहे. स्व. हरिभाऊ जावळे हे शेतकऱ्यासाठी चालते फिरते मदत केंद्रच होते म्हणून त्यांना समर्पित अशी योजनेची सुरुवात करण्यात आली. प्रदेशाने दिलेल्या आगामी कार्यक्रम जिल्ह्यात राबवावे अशी माहितीही  जिल्हाध्यक्षांनी दिली. आंतरराष्ट्रीय योग दिन व आणीबाणीचा  काळा दिवस प्रत्येक मंडल स्तरावर कोरोनाचे नियम पाळून संपन्न करावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष आ. भोळे यांनी केले. अॅड.किशोर काळकर यांनी आगामी काळातल्या निवडणुका लक्षात घेऊन पक्षाची संघटनात्मक स्थिती मजबूत कशी होईल यावर मार्गदर्शन केले. सूत्र संचलन के.बी.साळुंखे यांनी व प्रस्तावना मधुभाऊ काटे यांनी केले.  संघटनात्मक आढावा.सचिन पानपाटील यांनी घेतला व आभार संतोष खोरखेडे यांनी मानले. बैठकीत जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हा आघाड्यांचे अध्यक्ष व मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सरचिटणीस पूर्ण वेळ उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/797526491155219

 

Protected Content