जळगाव प्रतिनिधी । भाजपने राज्य सरकारविरूध्द आंदोलनाची हाक दिली असून याच्या पहिल्या टप्प्यात सरकारला जाब विचारणारे निवेदन देतांना माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि त्यांच्या स्नुषा खासदार रक्षाताई खडसे यांची गैरहजेरी चर्चेचा विषय बनली आहे. खडसेंची ही नाराजी आगामी वाटचालीची निदर्शक असल्याचे आता मानले जात आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रसार रोखण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करून विविध मागण्यांसाठी मंगळवारी भाजपच्यावतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरुद्ध जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी झाडून हजेरी लावली होती. परंतू माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि खासदार रक्षाताई खडसे हे दोघं मात्र, गैरहजर होते. त्यामुळे खडसेंचा राग कायम आहे की, फक्त गिरीश महाजन हे आल्यामुळे खडसेंनी मुद्दाम येण्याचे टाळले? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
विधान परिषदेला तिकीट नाकारल्यानंतर एकनाथराव खडसे यांनी सतत पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. भाजपात आता लोकशाही नाही राहिलेली नाही. ”काही निवडक दोनचार जण पक्ष चालवताय अगदी आम्हाला तिकीट देतो म्हणून फसवले गेले”, असे आरोप खडसे यांनी केले आहेत. त्यावरून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खडसे यांच्यात जोरात वाक्युद्ध रंगले होते. दरम्यान, काल जिल्हाधिकार्यांना निवेदन देताना माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे, खासदार उन्मेश पाटील, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, आमदार रामूमामा भोळे, आमदार चंदूभाई पटेल, आमदार स्मिताताई वाघ, आमदार संजय सावकारे, लालचंद पाटील, माजी जि.प.उपाध्यक्ष नंदू महाजन, माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवानी, भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी यांच्यासह अनेक महत्वपूर्ण नेते,पदाधिकारी उपस्थित होते. परंतू माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि खासदार रक्षाताई खडसे यांनी हजेरी लावली नाही. त्यामुळे राजकीय चर्चेला उधान आले होते. दरम्यान, माजी आमदार गुरुमुख जगवाणी यांनी ”खडसे आणि महाजन या दोन्ही नेत्यांनी आपापल्या कडील चारचार चमचे कमी केले तर दोघांमधील काही दिवसातच संपुष्टात येईल” असे वक्तव्य लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत केले होते. यामुळे भाजपमधील अस्वस्थता समोर आली होती.
दरम्यान, एकनाथराव खडसे आणि रक्षाताई खडसे यांनी जळगावात निवेदन देतांना हजेरी लावली नाही. यासोबत मुक्ताईनगरात निवेदनालाही ते अनुपस्थित होते. येथे देण्यात आलेल्या निवेदनावर त्यांच्या स्वाक्षर्या असल्या तरी ते देतांना मात्र खडसे नव्हते. यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.