भाई जगताप भाजपवर खवळले

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  “गुजरातच्या तत्कालीन गृहमंत्र्यांवर आरोप करणारे आयपीएस संजीव भट्ट जेलमध्ये आहेत. परमवीर सिंह कोर्ट फिरतायत… आणि भक्त लोकशाही वर ज्ञान पाजळतायत..”, असं ट्विट काँग्रेसचे नेते  भाई जगताप यांनी केलं आहे.

 

 

मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आल्यानंतर वरीष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी ठाकरे सरकारवरच लेटरबॉम्ब टाकत खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रामध्ये सिंह यांनी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करत बदलीच्या निर्णयाला आवाहन दिलं आहे. सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी ट्विटरवरुन भाजपा समर्थकांवर निशाणा साधाला आहे.

 

गुजरातमधील निलंबित माजी आयपीएस अधिकारी  संजीव भट्टला २०१९ साली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ताब्यात असणाऱ्या आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी न्यायालयाने संजीव भट्टला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून तो सध्या तुरुंगामध्ये आहे.

 

संजीव भट्टचं नाव चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मंगळवारी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना संजीव भट्टचा उल्लेख केला होता. “राज्यसभा, लोकसभेत गोंधळ घालत सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्याच्या पत्रावर इतका विश्वास ठेवून राजीनामा मागितला जात असेल तर मला विचारायचं आहे की, गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना आयपीएस अधिकारी संजीव भट्ट, प्रदीप शर्मा यांनी वारंवार अशी पत्रं लिहिली आहे. तर मग त्या पत्राच्या आधारे गुजरात सरकारचे माजी मुख्यमंत्री किंवा सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर कारवाई करणार आहात का? संजीव भट्ट यांनी केलेले आरोप परमबीर सिंह यांच्यापेक्षाही गंभीर होते. तुम्ही संजीव भट्टला जेलमध्ये टाकलं. तर मग महाराष्ट्रात वेगळा न्याय आणि गुजरातमध्ये वेगळा न्याय का? ही कोणती राज्यघटना आहे?,” अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे. “संजीव भट यांचं पत्र पुन्हा समोर आणावं असं माझं कायदामंत्र्यांना आवाहन आहे. आणि जे लोक लोकसभा आणि राज्यसभेत नाचत होते त्यांनी संजीव भट यांचं पत्र समोर आणावं आणि त्यावरही कारवाईची मागणी करावी,” असं संजय राऊत म्हणाले

 

सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर ठाकरे सरकार टीकेचे धनी ठरले. अचानक करण्यात आलेल्या बदलीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांच्याकडून चुका झाल्याचा ठपका ठेवला.

 

अनिल देशमुख यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप सिंह यांनी याचिकेत केलेला आहे. सिंह यांनी याचिकेत  अनिल देशमुख यांच्या गैरव्यवहारांची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून करण्यात आलेली बदली बेकायदेशीर असून, ती रद्द करण्यात यावी आणि पुढील कारवायांपासून संरक्षण मिळावं, अशा मागण्या केलेल्या आहेत. मंगळवारी रात्री राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.  या भेटीत वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या रिपोर्टवर चर्चा झाल्याचं वृत्त आहे.

Protected Content