भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन पुरस्कृत पुरस्कार जाहीर

जळगाव प्रतिनिधी । भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनने पुरस्कृत केलेले पुरस्कार डॉ. मोहन आगाशे आणि भाई पवार यांना १२ रोजी प्रदान करण्यात येणार आहे.

मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने नटवर्य लोटूभाऊ पाटील नाट्यपुरस्कार ज्येष्ठ नाट्य, चित्रपट अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना तर भाई संपतराव पवार (बलवडी जि. सांगली) यांच्या मी लोकांचा सांगाती या ग्रंथासाठी कै. यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार येत्या १२ मार्च रोजी मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात कविवर्य ना. धों. महानोर यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. प्रत्येकी ११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जैन इरिगेशनची सेवाभावी संस्था भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनने हे पुरस्कार पुरस्कृत केलेले आहेत.

कान्हदेशच्या जवळच असलेल्या मराठवाड्यातील सोयगाव येथे लोटू पाटील यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी मराठी नाट्यपरंपरा रुजवली. कै. लोटूभाऊ पाटील यांच्याशी जैन इरिगेशनचे असलेले भावनिक आणि भौगोलिक नाते आहे. लोटू पाटील यांच्या श्रीराम नाट्य मंडळीने शंभरी गाठली. त्यावेळी विशेष सोहळा आयोजण्यात आला होता त्यात जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन हे त्यासाठी आवर्जून उपस्थित होते. सव्वाशे वर्षांपूर्वी अजिंठ्याच्या पायथ्याशी सोयगाव सारख्या हजार लोकवस्तीच्या खेड्यात श्रीराम संगीत मंडळी उभी राहिली. खेड्यात स्व. लोटू पाटील यांनी खर्‍या अर्थाने नाट्य चळवळ उभी केली. त्यामुळे त्यांच्या नावाने मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने २००६ पासून रंगभूमीसाठी उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या रंगकर्मींला हा पुरस्कार देण्याबाबत भवरलालजी जैन यांनी जाहीर केले होते, त्यानुसार हा पुरस्कार देणे सुरू झालेला आहे.

महाराष्ट्राचे शिल्पकार कै. यशवंतराव चव्हाण यांचे वाङ्मय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सर्वांना ठाऊकच आहे. कै. यशवंतरावजी चव्हाण यांच्याशी जैन इरिगेशनचे असलेले वैचारीक व भावनीत नाते आहे. लोकनेते यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार २००६ पासून सुरू करण्यात आला आहे. १२ मार्च हा कै. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म दिवस असतो त्या औचित्याने भाई संपतराव पवार यांना त्यांच्या मी लोकांचा सांगाती या ग्रंथासाठी कै. यशवंतराव चव्हाणवाङ्मय पुरस्कार देण्यात येणार आहे. या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील तसेच भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचे विश्‍वस्त कविवर्य ना.धो. महानोर यांनी केले आहे.

Add Comment

Protected Content