भरधाव रिक्षाची दुचाकीला धडक; विद्यार्थी जखमी

जळगाव प्रतिनिधी । महाविद्यालयातून दुचाकीने जळगावात घरी परतणाऱ्या तरूणाला भरधाव रिक्षाने जोरदार धडक दिल्याची घटना गुरूवारी सायंकाळी शिवकॉलनी उड्डाणपुलाजवळ घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील वैभव पोपट महाजन (वय-२१ रा. लोहारा ता. पाचोरा) हा धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील त्रिमुर्ती कॉलेज महाविद्यालयात फार्मसीच्या द्वितीय वर्षाला आहे. २९ रोजी वैभव महाविद्यालयात काम आटोपून दुचाकीने (क्र.एम.एच.19 सी.टी.८८४२) सायंकाळी जळगाव शहराकडे येत असतांना त्याच्या दुचाकीस राष्ट्रीय महामार्गावर शिवकॉलनी उड्डाणपूलाजवळ दुचाकीस समोरुन येणार्‍या तीन चाकी रिक्षाने ( क्र.एम.एच. १९ व्ही. ९३७६) ने धडक दिली. यात वैभवच्या उजव्या पायाला दुखापत झाली. तर त्याच्या दुचाकीचे पुढच्या बाजूचा साईडचा ग्लास व उजव्या बाजूचा साईटचा पॅनल व बे्रक याप्रकारे नुकसान झाले. दुचाकीच्या नुकसानाबाबत भरपाई मागितली असता, रिक्षाचालकाने भरपाई देण्यास नकार दिला. यानंतर वैभव महाजन याने संबंधित रिक्षाचालकाविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार कल्याण कासार करीत आहेत.

Protected Content