इस्लामाबाद (वृत्तसंस्था) । जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे जवानांवर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. हल्ल्यानंतर भारत आणि पाक संबंधांमधील तणावात अधिक भर पडली आहे. वाढत्या तणाव आणि भारताच्या आक्रमक पवित्र्याने भयभीत झालेला पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान यांने आता शांततेची एक संधी द्या, अशी याचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. ‘आपण आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्यासंबंधी ठोस पुरावे दिले तर आपण तात्काळ कारवाई करू’ असे पुन्हा एकदा म्हटले आहे.
राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ‘दहशतवादविरोधात संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी आम्ही जलद गतीने पावले उचलत आहोत. यावेळी बरोबरीचा हिशोब चुकता केला जाणार. हा बदललेला भारत आहे. हे दु:ख सहन केले जाणार नाही. दहशतवादाला कसे चिरडायचे, ते आम्हाला चांगले कळते ‘ असे म्हटले होते. मोदी यांच्या सभेनंतर इम्रान खान यांनी शांततेची संधी देण्याचे आवाहन केले आहे.
‘इम्रान खान यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. तेव्हा मी पठाणचा मुलगा असून शब्द पाळणार असे म्हणाले होते. बघू आता काय करतात’ असेही मोदी सभेत म्हणाले. त्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. पंतप्रधान इम्रान खान आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्याचे ठोस पुरावे दिले तर तत्काळ कारवाई करू अशी याचीक करत एक वेळा संधी द्या अशी मागणी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदी यांच्याकडे केली आहे.