रावेर प्रतिनिधी । रावेर बोरखेडा रस्त्यावरील शेत शिवारात चार भावंडांची निर्घृण हत्या केल्याचा भयंकर प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या हत्येमुळे संपुर्ण जिल्हा हादरला आहे. यात मुलींचा समावेश आहे. घटनास्थळी रावेर पोलीस यंत्रणा दाखल झाली आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रावेर शहरालगत अंतरावरील बोरखेडा शेत शिवारात शेख मुस्ताक यांच्या शेतात गेल्या अनेक वर्षांपासून मयताब भिलाला हे आपल्या पत्नी आणि दोन मुली आणि तीन मुलांसोबत राहतात. मध्यप्रदेशात त्यांचे नातेवाईक राहतात. त्यांचे नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या दशक्रिया विधीसाठी पत्नी आणि मुलासह मध्यप्रदेशात 15 ऑक्टोबर रोजी गेले होते. दरम्यान दोन मुले आणि दोन मुली हे घरीच होते. चारही भावंडे जेवण करून झोपले असता मध्यरात्री अज्ञात व्यक्ती कुऱ्हाडीने वार करून चारही भावंडांची हत्या केली. सकाळी शेतमालक शेख मुस्ताक हे शेतात आले असता घर बंद दिसले. घरात डोकावून पाहिले असता. चारही मुलांचे मृतदेह आणि रक्तांचा सडा दिसून आला. हा भयंकर प्रकार पाहून शेख मुस्ताक यांनी रावेर पोलीसांना माहिती दिली. मयतामध्ये दोन मुलींचा समावेश आहे.
घटनास्थळी पोलीसांची धाव
घटनेची माहिती मिळताचा विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यावेळी पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे, सपोनि शितलकुमार यांच्यासह पोलीसांचा ताफा दाखल झाला आहे. नेमकी हत्या कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप कळू शकले नाही.
भादली हत्याकांडाची पुनरावृत्ती
आज झालेल्या हत्याकांडामुळे संपुर्ण जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. पाच वर्षांपुर्वी जळगाव तालुक्यातील भादली येथे एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली होती. अद्यापपर्यंत हत्या करणाऱ्या आरोपींची शोध घेण्यास जिल्हा पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. आजही त्याच प्रकारच्या हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. नवनियुक्त पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे आणि पोलीस यंत्रणेला आरोपी शोधण्यासाठी आता आव्हान राहणार आहे.
जळगावहून श्वान पथक रवाना
अपर पोलीस अधिक्षक चंद्रकात गवळी यांनी घटनास्थळी दाखल झाले आहे. जळगाव येथून श्वान पथक आणि फिंगर पिंट शोध पथक रवाना झाले आहे. मारेकऱ्यांनी कुऱ्हाडीने वार करून पळकाढल्यानंतर काही संशयित वस्तू मिळतात का? याचा शोध घेणे सुरू आहे. रावेर पोलीस पथक शेतशिवारातील संपुर्ण परिसर पिंजून काढत आहे.