नाथाभाऊंच्या मुद्द्यावर अजित पवारांचे कानावर हात

पुणे : वृत्तसंस्था । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलंय. राजकीय जीवनात अनेक भेटीगाठी होत असतात, त्यामुळे भेट झाली म्हणजे काही तरी काळंबेरं आहे असं समजू नये, असं अजित दादा म्हणाले.

अजित पवारांच्या हस्ते पुण्यात विधान भवन येथे रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. भाजप सत्तेत असतानाही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून भाजपच्या नेत्यांना भेटायचो. तुम्ही मला गेली कित्येक वर्ष ओळखता, असंही अजित पवार म्हणाले. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल आपल्याला काहीही माहित नाही. जेवढं माहित होतं तेवढं तुम्हाला सांगितलंय, असंही सांगायला ते विसरले नाही.

भाजपात नाराज असलेले एकनाथ खडसे मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहेत. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश निश्चित मानला जातोय. काही दिवसांपूर्वीच मुक्ताईनगरमध्ये खडसेंनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती, ज्यात पुढील निर्णयावर मंथन झाल्याची माहिती आहे. खडसेंनी यावर थेट काहीही सांगितलेलं नाही. तर राष्ट्रवादीकडूनही मौन बाळगलं जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून डावललं जात असल्याचा आरोप करत एकनाथ खडसे भाजपात नाराज आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी अनेकदा थेट नाव घेऊन निशाणाही साधला होता. त्यामुळे भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचे संकेत एकनाथ खडसे यांनी यापूर्वीच दिले आहेत.

Protected Content