मुंबई: ‘वृत्तसंस्था । गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील रापर शहरात भरबाजारात वकिलाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. सोशल मीडियावर ब्राह्मणविरोधी पोस्ट केल्यामुळे वकिलाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.
रापर येथे भरदिवसा वकील देवजीभाई माहेश्वरी यांची त्यांच्या ऑफिसजवळच एका तरुणाने चाकूने भोसकून हत्या केली. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मारेकरी ऑफिसजवळच दबा धरून बसला होता. ते बाहेर येताच आरोपीने त्यांच्यावर चाकूने वार केले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेनंतर मारेकरी फरार झाला होता.
पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. मुंबई क्राइम ब्रांच युनिट ९ चे पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, संजीव गावडे यांच्या पथकाला आरोपीविषयी माहिती मिळाली. आरोपी भरत जयंतीलाल रावत हा मुंबईतील मालाडमध्ये येणार असल्याचे समजले होते पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याची चौकशी केली असता, माहेश्वरींकडून सोशल मीडियावर वारंवार ब्राह्मणविरोधी पोस्ट शेअर करण्यात येत होत्या. त्यावर नाराजीही व्यक्त केली होती. मात्र, ते अशा प्रकारच्या पोस्ट टाकतच होते, असे त्याने पोलिसांना सांगितले. वकील आणि आरोपी यांच्यात बाचाबाचीही झाली होती. आरोपीने वकिलाला धमकावले सुद्धा होते.