अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आज दि. ६ ऑगस्ट रोजी बोरी मध्यम प्रकल्पात रात्री उशिरापर्यंत येणाऱ्या पाण्याची आवक पाहता ८० टक्के जिवंत साठा होण्याची शक्यता असल्याने बोरी नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा करण्यात आला आहे.
मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज पाहता धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणारा पाण्याचा येवा बघता धरण सुरक्षिततेचा आढावा घेऊन आज रात्री बोरी धरणातून जास्तीचे पुराचे पाणी सांडव्याद्वारे खाली बोरी नदीत पात्रात सोडण्याची शक्यता आहे. तरी नदी काठावरील नागरिकांनी सावध रहावे, सतर्कता बाळगावी, कोणतीही जीवित व वित्तहानी होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, पुराचा प्रवाह हा पाणलोट क्षेत्रातून येण्याप्रमाणे कमी जास्त करण्यात येईल. साधारणतः धरणातून करण्यात येणारा विसर्ग हा सुरवातीला ४५१ क्यूसेक इतका राहील. त्यानंतर पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या येवानुसार विसर्ग वेळोवेळी कमी जास्त होऊ शकतो. तरी सर्वांनी खबरदारी घ्यावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव व जिल्हा प्रशासन जळगाव तसेच अमळनेर तालुका प्रशासनाने केले आहे.