बोदवड प्रतिनिधी । स्वत: कोरोना बाधीत असूनही येथील एका डॉक्टरने रूग्णांची तपासणी केल्याने तब्बल ४७ जण बाधीत झाले आहेत. यामुळे संतापलेल्या जमावाने त्यांच्या दवाखान्याची तोडफोड केल्याची घटना येथे घडली.
याबाबत वृत्त असे की, येथील शालीमार टॉकीजमागे नाडगाव रोड येथील एका डॉक्टरने स्वॅब दिल्यानंतर क्वॉरंटाईन होण्याऐवजी रूग्णांची तपासणी केली होती. हा डॉक्टर नंतर कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. यातच त्याने तपासणी केलेल्या रूग्णांपैकी शेलवडसह परिसरातील काही जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले होते. याबाबत आधीच पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांमध्ये या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्यांपैकी तब्बल ४७ जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली. यातच या डॉक्टरच्या दवाखान्याची सोमवारी दुपारी अज्ञात लोकांनी तोडफोड केल्याचे दिसून आले. या संदर्भात बोदवड पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.