चाळीसगाव, प्रतिनिधी । मिशन पाचशे कोटी लिटर अंतर्गत जल योद्धा म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जलमित्रांना कृषी पदवीधर युवा शक्ती महाराष्ट्र या सामाजिक संघटनेकडून तालुक्यातील बोढरे येथे सन्मानित करण्यात आले.
चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागात मिशन पाचशे कोटी लिटर अंतर्गत विविध विकास कामे केली जात आहेत. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून पोकलॅन्ड मशीन उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना शेतातील बांध बांधून देणे, रस्ता रुंदीकरण व खोलीकरण करणे, रब्बी हंगामात पाणी शेतात जिरावा यासाठी खड्डे खणून देणे, नाला खोलीकरण असे अनेक विकासकामे या अभियानांतर्गत केले जात आहेत. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने डिझेल भरून मशीनच्या साहाय्याने वरील कामे करून घेत आहेत. ईडीचे जॉईंट कमिशनर डॉ. उज्वलकुमार चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा अभियान तालुक्यात एक आदर्श निर्माण करत आहेत. मिशन पाचशे कोटी लिटर टीमने जलसाठा निर्माण करण्यासाठी केलेल्या वाखाणण्याजोगा कार्याबद्दल कृषी पदवीधर युवा शक्ती महाराष्ट्र या सामाजिक संघटनेकडून एकूण ११ जलमित्रांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ईडीचे जॉईंट कमिशनर डॉ. उज्वलकुमार चव्हाण, प्रा. आर. एम. पाटील, प्रा. तुषार निकम, हिरकणी महिला मंडळाच्या सुचित्रा पाटील, नगरसेविका सविता राजपूत, माजी सरपंच शेखर निंबाळकर (रांजणगाव), कृषी सहायक तुफान खोत, शशांक अहिरे, सोमनाथ माळी, कृष्णा रूईकर, जितू परदेशी व प्रकाश राठोड आदींना सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला अभिवादन करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. उज्वलकुमार चव्हाण यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना शेतात छोटे-छोटे बंधारे बांधून ठेवले तर रब्बी हंगामात ते पाणी शेता बाहेर न जाता शेतातच जिरमान होतील. त्याचबरोबर हे अभियान सर्वांसाठी असून कोणीही याचा लाभ घेऊ शकता. आम्ही राजकारण करत नसून समाजकारण करीत आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन चव्हाण यांनी केले आहेत.