पाटणा वृत्तसंस्था । बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालातील पहिल्या टप्प्यात राजद-काँग्रेसच्या महागठबंधनने आघाडी घेतली असली तरी नंतर सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जोरदार मुसंडी मारली असून हाच कल कायम राहिल्यास पुन्हा एकदा सत्ताधार्यांची सरशी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
बिहारमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणूक झाली. यात भाजप, जेडीयू आणि मित्रपक्षांची एनडीए आणि राजद, काँग्रेस व मित्रपक्षांचे महागठबंधन यांच्यात प्रचंड चुरशीची लढत झाली. पहिल्यांदा ही लढत अगदीच एकतर्फी होणार असल्याचे वाटत होते. मात्र शेवटच्या टप्प्यात महागठबंधनने जोरदार आगेकूच केली आहे. निवडणुकीनंतरच्या बहुतांश एक्झीट पोलमध्ये हीच महाआघाडी सत्तेवर येणार असल्याचे दर्शविण्यात आले आहे.
दरम्यान, पहिल्यांदा पोस्टल मतमोजणी सुरू करण्यात आली. यात महागठबंधन हे आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. यानंतरही प्राथमिक फेर्यांमध्ये हाच कल राहिली. नंतर मात्र स्थिती बदलली. ताज्या कलाचा विचार घेतला असता महागठबंधन हे १०९ जागांवर आघाडीवर असून एनडीएला १२१ जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसून येत आहे. हाच कल कायम राहिल्यास बिहारमध्ये एनडीए हे निर्णायक बहुमत मिळवू शकते. अर्थात, प्रत्यक्ष मतमोजणीत येत्या काही तासांमध्ये हे चित्र स्पष्ट होणार आहे.