पाटणा : वृत्तसंस्था । बिहार विधानसभेच्या ५० जागा शिवसेना लढवणार आहे खुद्द शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बिहारमध्ये दाखल होणार आहेत. शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादीही निवडणूक आयोगाकडे सोपवली आहे.
शिवसेनेकडून २२ स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशिवाय संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी, सुभाष देसाई, अनिल देसाई, विनायक राऊत, गुलाबराव पाटील, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने यांचा या यादीत समावेश आहे.
महाराष्ट्राबाहेर फारसा जम नसलेल्या शिवसेनेने आत्तापर्यंत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार आणि गोवा इथल्या निवडणुकांत भाग घेतलाय. बिहार विधानसभेत एकूण २४३ जागांपैंकी ५० जागांवर शिवसेनेकडून उमेदवार उभे केले जाणार आहेत.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही बिहार निवडणुकीत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून महाराष्ट्राचे जवळपास ६० नेते बिहार निवडणुकीत प्रचार करताना दिसणार आहेत. बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून ४० जणांची स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली आलीय.