चाळीसगाव दिलीप घोरपडे । तालुक्यात आजवर एकही कोरोना बाधीत आढळला नसतांना आज नांदगाव तालुक्यातील रूग्णामुळे चाळीसगावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे आता नागरिकांनी लॉकडाऊनचे अधिक तंतोतंत पालन करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत वृत्त असे की, आजवर एकही कोरोनाबाधीत नसल्याने निर्धास्त असणार्या चाळीसगावकरांनी आज सायंकाळी जबर धक्का बसला आहे. शहरातील गजानन हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असणार्या रूग्णाला नाशिक येथे उपचारासाठी पाठविण्यात आले होते. हा रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आल्याने चाळीसगावात खळबळ उडाली आहे. हा रूग्ण नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील रहिवासी असून त्याच्यावर गजानन हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आल्यानंतर संबंधीत हॉस्पीटल सील करण्यात आले आहे. तर या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांना आता होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. आमोदे येथील रूग्णामुळे आता चाळीसगाव तालुक्यात देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
चाळीसगावकरांनी आजवर संयम पाळला असून लॉकडाऊनचे चांगले पालन केले आहे. तथापि, बाहेर गावच्या रूग्णामुळे आता कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. हा रूग्ण चाळीसगावमध्ये त्याच्या संपर्कात आलेल्यांमुळेच पॉझिटीव्ह झाल्याची चर्चा आता सुरू आहे. यामुळे त्याच्या संपर्कात आलेला पॉझिटीव्ह कोण याची विचारणा करण्यात येत आहे. त्याच्या संपर्कात आलेल्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून त्याचीं देखील तपासणी करण्यात येणार आहे. यातून काही धक्कादायक प्रकार समोर येऊ नये अशी चाळीसगावकरांची अपेक्षा आहे.