कोरोना पॉझिटीव्ह रूग्णावर उपचार करणारे चाळीसगावातील हॉस्पीटल सील

चाळीसगाव दिलीप घोरपडे । कोरोना पॉझिटीव्ह रूग्णावर उपचार करणार्‍या चाळीसागवातील गजानन हॉस्पीटलला सील करण्यात आले असून रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, आजवर एकही कोरोनाबाधीत नसल्याने निर्धास्त असणार्‍या चाळीसगावकरांनी आज सायंकाळी जबर धक्का बसला आहे. शहरातील गजानन हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असणार्‍या रूग्णाला नाशिक येथे उपचारासाठी पाठविण्यात आले होते. तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आल्याने चाळीसगावात खळबळ उडाली आहे. हा रूग्ण नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील रहिवासी असून त्याच्यावर गजानन हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आल्यानंतर संबंधीत हॉस्पीटल सील करण्यात आले आहे. तर या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांना आता होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. आमोदे येथील रूग्णामुळे आता चाळीसगाव तालुक्यात देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले असून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

Protected Content