मुंबई लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्य मंत्रीमंडळाच्या सदस्यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन त्यांना वंदन केले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना कॅबिनेट मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हा आमच्यासाठी प्रेरणादीय असून याच विचाराने राज्याची प्रगती होणार असल्याचे प्रतिपादन केले.
राज्य मंत्रीमंडळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या गटाच्या नऊ मंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी शपथ घेतली. यानंतर आज मुंबईतल्या शिवाजी पार्कवर या सर्व मंत्र्यांनी जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला वंदन केले. यात राज्याचे माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे माजी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा देखील समावेश होता.
याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू व मराठी जनतेच्या हितासाठी आपले आयुष्य अर्पण केले असून त्यांनी प्रखर हिंदुत्वाचा विचार मांडला आहे. आमच्यासाठी हाच विचार प्रेरणादायी असून भविष्यातील आमची वाटचाल यावरूनच होणार आहे. तसेच, हाच विचार प्रगतीचा विचार असून यात समाजातील सर्व घटकांना विकासाची संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.