पाचोरा, प्रतिनिधी । आदिवासी बालकांना पौष्टिक आहार मिळावा या उदात्त हेतूने माजी सैनिक धर्मराज पाटील यांनी पारोळा तालुक्यातील धाबे वस्तीतील बालकांसाठी पोषण आहार म्हणून उसळचे वाटप करून साप्ताह साजरा केला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पारोळा तालुक्यातील धाबे या आदिवासी वस्तीतील बहुतेक बालकांचे पालक हे पर जिल्हयात ऊसतोड व वीटभट्टी कामावर गेले असल्याने बालक सकस आहार पोषणापासुन या गरजेच्या कोरोना काळात वंचित आहेत. शाळेत गटागटाने ऑफलाईन शिक्षण, शाळा बाहेरील शाळा अंतर्गत रेडिओ कार्यक्रम व त्यांच्याकडे ऑनलाइन शिक्षणाची सुविधा जवळ जवळ उपलब्ध नाही म्हणुन अशा वेळी शाळा शिक्षक त्यांना गटागटाने किंवा वैयक्तिक मार्गदर्शनावर भर देतात. स्वाध्याय पत्रिकाही उपलब्ध करून देतात. याबाबत शाळेच्या वेळेत दोन तीनच्या गटागटाने बालक अडचणी सोडविण्यासाठी येतात. त्यावेळी शाळा शिक्षकांनी त्यांना नियमित बॉईल अंडी, सफरचंद, ग्लुकोज बिस्किट, केळी व राजगिरा लाडु सकस आहार पोषण म्हणुन वाटप सुरू केले.याची दखल विविध स्तरातून कौतुक म्हणुन घेतली. ते ऐकून पाचोरा येथील आर्मी मेडिकल कोअर मध्ये १७ वर्ष सेवा पुर्ण करून निवृत्त झालेले माजी सैनिक धर्मराज सतिलाल पाटील (कोळगावकर ) उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस कुस्ती मल्लविदया महासंघ यांनीही या बालकांच्या आरोग्यासाठी काही तरीभरीव मदत करण्याची इच्छा व्यक्त करून शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांच्याशी चर्चा करून यासाठी लागणारा सर्व खर्च पाठवुन आपले दातृत्व दाखविले. त्यातुन बालकांना “बालक पोषण आहार उसळ सप्ताह” संपन्न झाला.
सोमवार – मुग उसळ , मंगळवार – हरभरा उसळ , बुधवार – चवळी उसळ , गुरूवार – वाटाणा उसळ , शुक्रवार – मटकी उसळ व शनिवार – मिक्स भेळ त्यांना देण्यात आली.
सरासरी रोज ५२ बालकांनी गटागटाने येत व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग पाळत लाभ घेतला.
मुख्याध्यापक साळुंखे यांच्या पत्नी चित्रा साळुंखे – पाटील यांची मागच्या महिन्यात सर्जरी झालेली असतांना सुद्धा बालकांच्या प्रेमापोटी ५ दिवस रुचकर अशी मोड आलेली उसळ बनवुन दिली. मागेही शालेय पोषण आहार बनविणाऱ्या कुटुंबावरील संकटाच्या वेळी त्यांनी ८४ दिवस शाळेला मदत केली आहे. त्यामुळे त्यांचे व या उपक्रमाचे प्रायोजक दाते धर्मराज सतिलाल पाटील यांचे वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी आभार मानले आहेत.
जि. प. प्रा. शाळा धाबे येथील आदिवासी बालकांचा शिक्षकांकडुन सकस आहार देण्याचा उपक्रम आवडला. गरीब घरचीच मुले मुख्यतः सैन्यात भरती होतात त्यामुळे शिक्षणाबरोबरच ते शरिरानेही सुदृढ झाले पाहिजेत असे मत धर्मराज पाटील यांनी व्यक्त केले आहे.