चाळीसगाव, प्रतिनिधी | बारा बलुतेदार महासंघ व मायक्रो ओबीसी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळले यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे २६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक व इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी बारा बलुतेदार महासंघ व मायक्रो ओबीसी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. सदर अधिवेशन प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळले यांच्या अध्यक्षतेखाली असणार आहे. दरम्यान अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बारा बलुतेदार, अतुलेदार, एसबीसी, भटके विमुक्त, मायक्रो ओबीसी, मुस्लिम बलुतेदार, वंचित ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. तत्पूर्वी बारा बलुतेदार महासंघ प्रदेश प्रवक्ता किसनराव जोर्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली व साहेबराव कुमावत यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वपूर्ण बैठकिचे आयोजन २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता साईधाम निवासस्थानी करण्यात आले आहे.