बारावीचा निकाल तीन वर्षांतील गुणांच्या आधारे

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा आराखडा शिक्षण विभागाने अखेर जाहीर केला आहे. मूल्यमापनासाठी दहावी, अकरावीतील गुण आणि बारावीच्या वर्षांतील कामगिरी ग्राह्य़ धरण्यात येणार आहे .

 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यमंडळाला अवघ्या २८ दिवसांत निकालाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

 

केंद्रीय मंडळांच्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्याही बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता मूल्यमापनाचे सूत्रही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाप्रमाणेच (सीबीएसई) कायम ठेवण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना दहावीच्या राज्य मंडळाच्या परीक्षेतील सर्वोत्तम गुण मिळालेल्या तीन विषयांचे गुण, अकरावीचे गुण आणि बारावीच्या वर्षांतील चाचण्या, प्रकल्प आणि प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा यांआधारे मूल्यमापन करण्यात येणार आहे. निकाल जाहीर करण्याची नियमावली स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

 

बारावीचा निकाल जाहीर करताना ३०+३०+४० असे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार दहावीच्या परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळालेल्या तीन विषयांतील गुणांच्या आधारे ३० टक्के गुण देण्यात येतील. अकरावीच्या अंतिम परीक्षेच्या आधारे ३० टक्के गुण देण्यात येतील. तर बारावीच्या वर्षांत शाळांनी घेतलेल्या चाचण्या, सराव परीक्षा, सत्र परीक्षा, प्रात्यक्षिक यांच्याआधारे ४० टक्के गुण देण्यात येणार आहेत.

 

पुनर्परीक्षार्थी आणि बाहेरून परीक्षा देणारे (१७ क्रमांकाचा अर्ज भरणारे) विद्यार्थी यांचा निकाल दहावी आणि बारावी या दोनच वर्षांच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार दहावीतील गुणांना ५० टक्के आणि बारावीतील गुणांसाठी ५० टक्के असा भारांश निश्चित करण्यात आला आहे. पुनर्परीक्षार्थीचे यापूर्वी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विषय ग्राह्य़ धरण्यात येतील. पुनर्परीक्षार्थी यापूर्वीच्या परीक्षेत एकाही विषयांत उत्तीर्ण नसल्यास आणि खासगीरीत्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या वर्षांतील स्वाध्याय, चाचण्या यांआधारे मूल्यांकन केले जाईल.

 

Protected Content