बहुलीतील आगग्रस्तांना नाम फाउंडेशनकडून घरांच्या चाव्या

 

 पुणे : वृत्तसंस्था । बहुलीतील  आगीमध्ये घर गमावलेल्या लोकांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर असावं म्हणून अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ फाऊंडेशने पुढाकार घेतला आहे.

 

पुण्याजवळी बहुली गावात मार्च महिन्यामध्ये आग लागली होती. या आगीत अनेक संसार उघड्यावर आले होते. १६ घरं या आगीत खाक झाली होती. त्या सर्वांना नेहमीच समाजकार्यात पुढे असणाऱ्या नाम फाऊंडेशनने मदतीचा हात दिला आहे. अभिनेते नाना पाटेकर यांनी या सर्वांना नव्या घरांच्या चाव्या दिल्या.

 

यावेळी नाना पाटेकर म्हणाले, “आम्हाला घरं जळाल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे आम्ही या गावात आलो. पावसाळ्याच्या आधी ती घरं जळाली होती. मी त्यांना धीर दिला तुम्ही रडू नका, आपण दोन-तीन महिन्यात घरं बांधून घेऊ, असे त्यांना सांगितले होते”.

 

“यावेळी सर्व पक्षाची मंडळी सोबत होती. चांगलं करायचं म्हटल्यावर सगळी माणसं सोबत असतात. पक्ष बाजूला ठेऊन सर्व लोक एकत्र येतात हे मला बरं वाटतं. मी कुठल्या पक्षाचा नाही. जो चांगल काम करतो त्याला नमस्कार करायचा आणि जो वाईट काम करतो त्यालाही नमस्कार करायचा,” असंही ते म्हणाले.

 

नाना पाटेकर यांनी खडकवासाला धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. अनेक लोक या कामात आहेत. सिमेवर सुद्धा ‘नाम’ने ने प्रकल्प उभारला आहे. लेहला वॉटर एटीम सुद्धा उभारले आहेत, प्रत्येक कुटुंबाला एक-एक मशीन दिली आहे, याबाबत नाना पाटेकर यांनी माहिती दिली.

 

धार्मिक भेदभावार बोलतांना नाना पाटेकर म्हणले, “महाराष्ट्रातील माणूस देखील आपला आणि काश्मिरमधील माणूस देखील आपला आहे. माझ्या बहिणीने मुस्लीम धर्मातील युवकाशी लग्ण केलं. सर्व भावंडांनी सबंध तोडून टाकले . मात्र मी म्हटलं आपल्याला अब्बाच मिळाला. आपण त्याकडे कसे पाहतो हे महत्वाचे आहे.” यावेळी त्यांनी राजकारणावर बोलण्याचे टाळले. कोण काय करतय याकडे मी लक्ष देत नाही मी माझ्या कामात व्यस्त असतो, असे नाना म्हणाले.

 

Protected Content