

भोपाळ : वृत्तसंस्था । मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर शहरामध्ये आज सकाळी बस आणि ऑटो रिक्षाची धडक झाली यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मंगळवारी सकाळी शहरातील जुनी छावणी परिसरामध्ये हा भीषण अपघात झाला. अतिरिक्त पोलीस निरिक्षकांनी या अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाख करुये तर जखमींना ५० हजार रुपये भरपाई देण्याची घोषणा केलीय.
बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाल्याने रिक्षाचा चालक आणि रिक्षामधील नऊ महिलांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन जणांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस निरिक्षक रवी भदोरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. रिक्षामध्ये प्रामुख्याने महिला प्रवासी होत्या. एका कार्यक्रमाच्या ठिकाणी या महिला स्वयंपाक बनवण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी समोरुन आलेल्या मोरीनाकडे निघालेल्या बसने रिक्षाला समोरुन धडक दिली. मरण पावलेल्या माहिलांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलीस करत असल्याचं भदोरिया यांनी म्हटलं आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री चौहान यांनी ट्विटरवरुन घडलेल्या अपघाताबद्दल खेद व्यक्त केला आहे. “ग्वाल्हेरमध्ये बस आणि रिक्षाची धडक झाल्याने घडलेल्या अपघातामध्ये अनेकांचे प्राण गेल्याची माहिती मिळाली. मी इश्वराकडे प्रार्थना करतो की या मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी. या मृतांच्या नातेवाईकांना हा धक्का सहन करण्याची ताकद परमेश्वर देवो,” असं ट्विट चौहान यांनी केलं आहे.


