जळगाव प्रतिनिधी । पाचोरा बस आगाराच्या बस चालकाला बेदम मारहाण व शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या नेरी येथील एकाला तीन वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा आज जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली आहे.
याबाबत माहिती अशी की, पाचोरा बस आगाराचे बस चालक वाल्मिक सोमा जाधव हे (एमएच १४ बीटी ४५४) क्रमांकाची बस ३१ डिसेंबर २०१५ रोजी पाचोराहून चाळीसगाव येथे जात असतांना पाचोरा तालुक्यातील आखतवाडे गावाजवळ ललित उर्फ छन्नू प्रकाश पाटील (वय-४५) रा. नेरी ता. जामनेर हा स्कॉर्पिओ गाडी बस समोर आणून बस चालक वाल्मिक जाधव यांना सांगितले की तु नेरीला चल, तुला दाखवतो अशी धमकी दिली. बस चालक वाल्मिक जाधव हे बस घेवून नेरी येथे आले असता ललित पाटील याने बस थांबवून बस चालकाला बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी वाहक तुषार साखरे आणि इतर प्रवाश्यांनी सोडवासोडव केली. बस चालक यांनी नगरदेवळा ग्रामीण रूग्णालयात उपाचार घेतले. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात ललित पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला जळगाव जिल्हा न्यायालयात चालविण्यात आला. सरकारी वकी ॲड . सुरेद्र काबरा यांनी ९ साक्षिदार तपासले. यात चालक व वाहक यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायमुर्ती एस.जी. ठुबे यांनी आरोपी ललित पाटील याला दोषी ठरवून तीन वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा आणि ५ हजार रूपयांचा दंड ठोवला आहे. सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी तुषार मिस्तरी यांनी सहकार्य केले.