अहमदाबाद : वृत्तसंस्था । टोयोटा फॉर्च्युनर एसयूव्ही कारमध्ये बलात्कार करण्याइतकी जागा असते का? अशी विचारणा वडोदरा पोलिसांनी स्थानिक आरटीओ अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यावर आरटीओकडून ‘एक्स्पर्ट रिपोर्ट’च पोलिसांनी मागवला आहे.
गुजरातचे वडोदरा पोलीस बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास करत आहेत. त्यांनी आरोपीला अटक केली असून सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. मात्र, केस अधिकाधिक मजबूत करण्यासाठी वडोदरा क्राईम ब्रांचचे पोलीस पुरावे जमवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांमध्ये वडोदरा पोलिसांनी स्थानिक आरटीओकडे ही मागणी केली आहे. पोलिसांच्या या मागणीमुळे आरटीओचे अधिकारी चक्रावले असून अशा प्रकारची मागणी पोलिसांनी आरटीओकडे पहिल्यांदाच केल्याचं आरटीओ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
आरोपी भावेश पटेल आणि पीडित तरुणी एका तिसऱ्या मित्राच्या ओळखीने संपर्कात आले. पीडिता २६ एप्रिल रोजी एका फार्महाऊसवर पार्टीसाठी गेली होती. मात्र, रात्री पोलिसांचं गस्ती पथक तिथे पोहोचलं. तरुणी बाजूलाच लपली आणि तिने तिच्या मित्राला फोन करून आपल्याला तिथून नेण्यास बोलावले. मित्राने आरोपीला तिला घेण्यासाठी पाठवले. आरोपी भावेशने पीडितेला तिथून एका एसयूव्ही कारमधून नेले. एका अज्ञात स्थळावर नेऊन तिच्यावर कारमध्येच बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तरुणीला घरी सोडलं.
वापर झालेली एसयूव्ही कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. क्राईम ब्रांचने आरटीओकडे कारचं पुढचं सीट पुशबॅक केल्यानंतर तयार होणाऱ्या लेगस्पेसमध्ये बलात्कार होऊ शकतो का? अशी विचारणा केली आहे. कार सेंटर लॉक असेल, तर ड्रायव्हरव्यतिरिक्त इतर कुणी दरवाजे उघडू शकतं का? याविषयी विचारणा करण्यात आली आहे.
नाव न सांगण्याच्या अटीवर स्थानिक आरटीओ अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली “पोलीस अनेकदा आमच्याकडे हिट अँड रन किंवा अपघातात तांत्रिक मुद्द्यांवर माहिती देणारं प्रमाणपत्र मागतात. आम्ही वाहनाची स्थिती, त्याचे ब्रेक, वाहनाची नोंदणी, त्याचे मालक, ड्रायव्हिंग लायसन्स अशी माहिती देतो. पण पहिल्यांदाच पोलिसांनी एखाद्या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अशी काही माहिती आमच्याकडे मागितली आहे. पण आरटीओ फक्त तांत्रिक माहिती देऊ शकतं. आम्ही संबंधित गुन्हा त्या कारमधल्या तेवढ्या जागेत घडला होता की नाही हे नाही सांगू शकत. ते काम पोलिसांचं आहे”, असं या अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांची भूमिका वेगळी आहे. “सध्या ही केस फक्त पीडितेच्या तक्रारीवर आधारीत आहे. तिला पुरावाजन्य आधार देण्यासाठी आम्हाला ही माहिती गरजेची आहे. संबंधित कारमधल्या पुढच्या सीटच्या लेग स्पेसमध्ये बलात्काराचा गुन्हा होऊ शकतो, हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला ही माहिती हवी आहे. आम्ही यासाठी आरोपी भावेश पटेल आणि पीडितेची उंची देखील मोजली असून आरटीओकडून येणाऱ्या माहितीसोबत ही माहिती तपासून पाहिली जाणार आहे”, अशी प्रतिक्रिया क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक दिवानसिंह वाला यांनी दिली.
सेंट्रल लॉक सिस्टीमसंदर्भात माहिती का मागवली, याचं देखील कारण वाला यांनी दिलं आहे. “बचाव पक्षाकडून दावा केला जाऊ शकतो की महिलेने असा प्रसंग ओढवला असताना आणि गाडी एकाच जागी स्थिर असताना कारचा दरवाजा उघडून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न का नाही केला? त्यामुळे फक्त ड्रायव्हर सीटच्याच बाजूला असणाऱ्या कारच्या सेंट्रल लॉक सिस्टीमविषयी आम्ही माहिती मागितली आहे”, असं देखील वाला यांनी सांगितलं. “आम्हाला ही केस इतकी फुलप्रूफ करायची आहे की बचाव पक्षाला गुन्हा नाकारताच येऊ नये” असं देखील वाला म्हणाले.