अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या काशिनाथ चौकाजवळ कामावरून सायकलीने घरी जात असलेल्या ७० वर्षीय वयोवृध्दाला भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वासुदेव वामन महाजन वय 70 रा. रामेश्वर कॉलनी जळगाव असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे

मिळालेली माहिती अशी की, वासुदेव महाजन हे रामेश्वर कॉलनीत आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ते एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट नगरामध्ये सेक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीला होते. सोमवारी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता सुमारास ते रात्रपाळी ड्युटी करून सायकलने जळगाव -औरंगाबाद रस्त्यावरील काशिनाथ चौकाजवळील पेट्रोल पंपाच्या बाजूने घरी जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले, घटना घडल्यानंतर पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी कुटुंबीयांना फोन करून घटनेची माहिती दिली. कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेवून तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचारादरम्यान दुपारी ३ वाजता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत वासुदेव महाजन यांचा मुलगा नितीन महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवार १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२. ३० वाजता अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

Protected Content