बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात नरेंद्र मेहता यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई (वृत्तसंस्था) बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या आरोपांखाली दाखल गुन्ह्यात माजी भाजपा आमदार नरेंद्र मेहतांना हायकोर्टाचा अंतरिम दिलासा मिळाला आहे. २० मार्चपर्यंत कोणतीही अटक न करण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. गुन्हा रद्द करण्यासाठी मेहतांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

 

मागासवर्गीय महिलेस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणे, मुल जन्मास घालणे, राजकीय सत्तेच्या धमकीने सतत लैंगिक शोषण करणे आदी प्रकरणी मीरा भाईंदर भाजपाचे वादग्रस्त नेते, माजी आमदार नरेंद्र मेहतावर मीरारोड पोलीस ठाण्यात बलात्कार, अनुसुचीत जाती जमाती प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) व अन्य कलमांअन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस मेहतांच्या बंगल्यावर अटक करण्यासाठी गेले असता ते पसार झाले होते. विधी मंडळाच्या चालू अधिवेशनात मेहतांच्या महिला नगरसेविकेच्या शोषणचा मुद्दा गाजला होता व गृहमंत्र्यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. दरम्यान आपल्यावर लावलेला आरोप आणि गुन्हा रद्द करण्यासाठी मेहताने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान मेहतांना हायकोर्टाने अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. तर राज्य सरकारला उत्तर दाखल करण्याची २० मार्चपर्यंत मुदत हायकोर्टाने दिली आहे.

Protected Content