फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी पहिल्या दिवसापासून लढा देणार्या येथील पोलीस अधिकार्याला आज कोविड-१९ विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून ते लवकरच यावर मात करतील असा विश्वास शहरातून व्यक्त करण्यात येत आहे.
फैजपूर शहरात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर महसूल, नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने अतिशय चोख जबाबदारी पार पाडत कोरोनाच्या संसर्गापासून जनतेला दूर ठेवले. यानंतर शहरात रूग्ण आढळून आले तरी नंतर ते बरे देखील झाले आहेत. या पार्श्वभूमिवर, आज शहरात एक कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. हा रूग्ण दुसरा-तिसरा कुणी नसून कोरोना विरोधात पहिल्या दिवसापासून लढा देणारे पोलीस अधिकारी आहेत. अतिशय कर्तव्यदक्षतेने इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून झटणारे हे अधिकारी लवकरच कोरोनावर मात करतील अशी अपेक्षा शहरवासियांना आहे. संबंधीत अधिकार्याने जनहितासाठी पहिल्या दिवसापासून थेट रस्त्यावर उतरून संघर्ष केला असल्याने ते या बाधेवर सहजपणे मात करून पुन्हा कोविड योध्दा म्हणून सेवेत रूजू होतील अशी भावना अनेक हितचिंतकांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ बोलून दाखविली आहे. दरम्यान, पोलीस अधिकार्याला बाधा झाल्याच्या वृत्ताला प्रशासकीय सूत्रांनी दुजोरा दिला आहे.