कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत जिल्ह्यासाठी ‘ही’ ठरणार धोक्याची घंटा !

भुसावळ प्रतिनिधी | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या प्रतिकारासाठी प्रशासन तयारी करत असतांना कोरोना संसर्गाचे निदान करण्यात खूप मोठी अडचण येणार असल्याचा इशारा भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी दिला आहे.

भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमिवर, जिल्हा प्रशासनाला सावध करणारा एक इशारा निवेदनाच्या माध्यमातून जारी केला आहे. या निवेदनात नमूद केले आहे की, कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमध्ये रुग्ण करोना संक्रमित आहे की नाही याची संपूर्ण जबाबदारी ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथील प्रयोगशाळा मध्ये तपासणी करणारे प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्यावर होती. काही खाजगी लॅब मध्ये पण तपासणी करत होते, तर काही ठिकाणी शासनाने खाजगी लॅब ला प्रत्येक सॅम्पल नुसार दर ठरवले होते. मुख्यतः जास्त चाचण्या आरटीपीसीआर या प्रकारात सामान्य रुग्णालय,जळगाव याठिकाणी होत असून दिवसाला दोन ते अडीच हजार चाचण्या होत असते. मात्र आज फक्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ केवळ ५ जण काम करत असून ७ कर्मचारी वर्गाने असमर्थता दर्शवली आहे.

यासाठी सर्वात महत्वाचे कारण म्हणजे दि.३१/०८/२०२१ या तारखेला सर्व १२ कर्मचारी वर्गाची नियुक्ती संपुष्टात आल्याने नवीन नियुक्ती ही एसएमएस या कंत्राट कंपनी द्वारे भरण्यात येत आहे. आता या कंपनीला कक्ष सेवक ( वर्ग ४ ) हेच पद भरण्याचा अधिकार आहे. तर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे वर्ग ३ चे पद आहे. आता संबंधीत कंपनी यांना कक्ष सेवक ( वर्ग ४ )चे पद म्हणून भरती करत असून अतिरिक्त कार्य प्रयोगशाळा तंत्रज्ञ ,वर्ग ३ म्हणून काम करण्यास लावणार आणि पगार मात्र कक्ष सेवक वर्ग ४ नुसार देणार शिवाय मानधन पण कमी…! त्यामुळे ७ प्रयोगशाळा तंत्रज्ञ जे करोना महामारीच्या सुरवातीपासून अथक परिश्रम करत आहेत,त्यांनी याबाबत नकार दिला असून आगामी काळात जळगाव जिल्हासाठी धोक्याची घंटा असल्याचे डॉ. नि.तु. पाटील यांनी म्हटले आहे.

डॉ. पाटील यांनी आपल्या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, माझ्या माहितीनुसार आता दिवसाला २५० सॅम्पल पण तपासणी करणे अवघड होणार आहे शिवाय तिसर्‍या लाटेचा धोका आहेच. याबाबत मी आ.गिरीश महाजन(माजी मंत्री), आ. संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांना अवगत केलं असून लवकरात लवकर यावर तोगडा काढावा अशी विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणी लवकर तोडगा न निघाल्यास कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते असा इशारा डॉ. नि. तु. पाटील यांनी दिलेला आहे.

Protected Content