फैजपूर ता.यावल (प्रतिनिधी)। फैजपूर उपविभागात असलेल्या रावेर व यावल तालुक्याची आता कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. या दोन्ही तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75 टक्के झाले आहे. त्यामुळे आता केवळ 25 टक्के रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी दिली.
भविष्यातही नागरिकांनी काळजी घेत नियमांचे पालन केल्यास फैजपूर उपविभाग लवकरच कोरोना मुक्त होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. रावेर यावल तालुक्याच्या कोरोना रुग्णाबद्दलची आकडेवारी माहिती अशाप्रकारे आहे. सद्य:स्थितीत यावल तालुक्यातील केवळ 30 बाधित रुग्ण, तर रावेर तालुक्यातील 135 बाधित रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तसेच संशयित म्हणून यावल तालुक्यातील 23, तर रावेर तालुक्यातील 72 असे 95 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील केवळ 25 टक्के रुग्ण उपचार घेत आहेत.75 टक्के रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. त्यामध्ये यावल तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्के तर रावेर तालुक्याचे 70 टक्के आहे. तसेच जळगाव येथे यावल तालुक्यातील सात, तर रावेर येथील 63 असेच 70 रुग्ण उपचार घेत असल्याचेही डॉ.थोरबोले यांनी सांगितले.
मंगळवार पर्यंतची माहिती देताना डॉ.थोरबोले यांनी सांगितले की, दोन्ही तालुक्यातील आतापर्यंत एकूण 3470 जणांनी स्वब दिले. त्यात यावल तालुक्यातील 1710, तर रावेर तालुक्यातील 1760 जणांचा समावेश आहे. त्यामध्ये पॉझिटिव म्हणून समोर आलेले यावल येथील 367, तर रावेर येथील 562 जणांचा असा एकूण 929 जणांचा समावेश आहे. तसेच निगेटिव्ह म्हणून यावल तालुक्यातील 1343, तर रावेर तालुक्यातील 1198 अशा एकूण 2541जणांचा समावेश आहे.आजच्या घडीला एकही स्वब प्रलंबित नाही, तर तर दोन्ही तालुक्यातील कोरानाने मृत्यू झालेल्यांची संख्याही 64 आहे. त्यामध्ये यावल तालुक्यातील 26, तर रावेर तालुक्यातील 38 जणांचा समावेश आहे. हा मृत्युदर 6.9 टक्के इतका आहे.
फैजपूरच्या आता केवळ तीन रूग्णांवर उपचार सुरू
फैजपूर शहराची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. शहरात आतापर्यंत एकूण 69 बाधित रुग्ण आढळले होते. त्यापैकी 61 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर पाच रुग्ण मयत झाले आहेत. त्यामुळे आता केवळ तीन रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली.