कोच्ची । दिल्लीतील पराभव हा कोरोनाच्या प्रादूर्भावासारखा असल्याचे नमूद करत फेररचना न केल्यास काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचा इशारा पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिला आहे.
दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाचा झालेला दारुण पराभव म्हणजे करोना विषाणूच्या प्रादुर्भावासारखी भीषण आपत्ती असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केले आहे. ”काँग्रेस पक्षाने मूळापासून फेररचना करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा काँग्रेस पक्षाचे अस्तित्व अप्रस्तुत बनून जाईल, असा इशाराही रमेश यांनी दिला आहे. ते म्हणाले की, जर काँग्रेस पक्ष शिल्लक रहावा, असे वाटत असेल तर काँग़्रेसच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे. आपला अहंकार गेलाच पाहिजे. गेल्या ६ वर्षांपासून सत्तेबाहेर असूनही आपल्यातील काही जण अजूनही मंत्री असल्याप्रमाणेच वागत आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य आणि स्वायत्तता दिली गेली पाहिजे. आपल्या नेतृत्वातील सार आणि वैशिष्ट्य हे बदलले गेले पाहिजे.” असे रमेश यांनी सांगितले.
केरळ सरकारने आयोजित केलेल्या क्रिथी आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यामध्ये ते बोलत होते. ”भाजपने सीएएफविरोधी आंदोलनाचा वापर मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी केला, असा आरोपही रमेश यांनी केला. या शर्यतीमध्ये भाजप जरी विजयी झाली नसली, तरी काँग्रेसचाही मोठा पराभव झालेला आहे. हा पराभव करोना विषाणूच्या आपत्तीसारखाच आहे. दिल्लीच्या निकालाने गृहमंत्री अमित शहा यांच्या राजकीय शैलीचा पराभव केला आहे”, असेही रमेश म्हणाले.