फिदा हुसेन यांच्यासह ३ भाजप नेत्यांची हत्या

श्रीनगरः वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या सुरूच आहेत. आता कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस फिदा हुसेन यांच्यासह ३ नेत्यांची हत्या केली. ओमर रशीद बेग आणि अबडर रशीद बेग अशी आणखी दोन नेत्यांची नावे आहेत.

गुरुवारी रात्री आठ वाजता भाजपच्या या तीन नेत्यांवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती कुलगाम पोलिसांना मिळाली. यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दहशतवाद्यांनी भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. या हल्ल्यात फिदा हुसेन, उमर रशीद बेग आणि अबडर रशीद बेग हे तिघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

. हा परिसर सुरक्षा दलांनी घेरला आहे. कुलगाम व्यतिरिक्त शोपियानमध्येही दहशतवादी हल्ला झाला आहे. यात एक तरुण जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप नेत्यांवर सातत्याने हल्ले होत आहेत. गेल्या महिन्यात मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातही एका भाजप कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. बडगाममधील दलवास गावात भाजप कार्यकर्ते आणि ब्लॉक डेव्हलपमेंट कौन्सिलर यांची त्यांच्या घरात गोळ्या घालून हत्या केली गेली.

खग बडगामचे बीडीसी अध्यक्ष आणि सत्ताधारी भाजपाचे सरपंच भूपिंदर सिंग यांची त्यांच्या घरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दहशतवादी संघटना टीआरएफने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

ऑगस्टमध्ये दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये भाजप नेते सज्जाद अहमद यांची गोळ्या घालून हत्या केली होती. या महिन्याच्या ४ तारखेला काझीगुंडमधील अखरण भागात मीर बाजारात दहशतवाद्यांनी गोळीबार करून भाजपचे सरपंच आरिफ अहमद यांची हत्या केली होती.

जुलैमध्ये जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी भाजप नेते वसीम बारी यांची हत्या केली होती. दहशतवाद्यांनी वसीम बारी आणि त्याचे वडील आणि भाऊ यांच्यावरही गोळीबार केला. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. भाजप नेते वडील आणि भावासोबत दुकानात होते. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

Protected Content